अमेरिकेने शनिवारी पहाटे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनांच्या तळांवर ड्रोनने बॉम्ब हल्ले केले. काबूलमधील हल्लेखोरांना धडा शिकवू असं अमेरिकने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी स्पष्ट केल्यानंतर अवघ्या ४८ तासांमध्ये अमेरिकेने काबूल विमानतळावर हल्ला केल्यानंतर जबाबदारी स्वीकारणाऱ्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या तळांवर बॉम्ब हल्ले केले. यासंदर्भातील माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पँटागॉनने दिली आहे. काबूल विमानतळावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यात ९५ अफगाणी नागरिक व १३ अमेरिकी सैनिक ठार झाले आहेत. या हल्लयामध्ये प्राण गमावणाऱ्यांमध्ये १३ अमेरिकन सैनिक असल्याने अमेरिका या हल्ल्यानंतर चांगलाच खवळला होता. इस्लामिक स्टेटच्या खुरासान मॉडेलने म्हणजेच आयएसआयएस के या संघटनेनं बॉम्ब हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. अमेरिकने पुन्हा एकदा काबूल विमानतळावर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली असून लवकरात लवकर येऊन आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत.

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकन लष्कराने हे हल्ले नानगहर प्रांतामध्ये केले. सुरक्षेच्या कारणांमुळे अमेरिकन नागरिकांना विमानतळांच्या वेगवेगळा प्रवेशद्वारांपासून तात्काळ दूर होण्यास सांगण्यात आलं आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी यासंदर्भातील माहिती जारी केलीय. “अमेरिकन लष्कराने एक आयएसआयएस के प्लॅनरविरोधात दहशतवादीविरोधी मोहीम राबवली आहे,” असं अर्बन म्हणालेत. इस्लामिक स्टेटच्या खुरासानने काबूल विमानतळावर हल्ला केल्याची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र या ड्रोन हल्ल्यांमुळे आयएसआयएसला किती नुकसान झालं आहे पक्की माहिती समोर आली नसली तरी प्राथमिक अंदाजानुसार काबूल विमानतळावर आत्मघाती हल्ला करणाऱ्यांचा खात्मा करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

नक्की वाचा >> करोना उत्पत्तीवरुन बायडेन यांचा चीनवर हल्लाबोल; पुन्हा एकदा चीन विरुद्ध अमेरिका संघर्ष पेटणार?

कॅप्टन अर्बन यांनी, “हा एख मानवविरहित हल्ला होता. जो अफगाणिस्तानमधील नानगहर प्रांतात करण्यात आलाय. प्राथमिक अंदाजानुसार आम्हाला लक्ष्य साध्य करण्यात यश आलं असून आम्ही त्यांचा खात्मा केलाय. या हल्ल्यात कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती आम्हाला मिळालेली नाही,” असं स्पष्ट केलं आहे. विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने मागील २० वर्षांमध्ये अशाप्रकारे अफगाणिस्तानमध्ये केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. व्हाइट हाऊसचे प्रसारमाध्यम सचिव जेन साकी यांनी शुक्रवारी (स्थानिक वेळेनुसार) दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन अधिकाऱ्यांनी काबूलमध्ये आणखीन एका दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. अजूनही धोका कायम असून आमच्या सैनिकांच्या जीवालाही धोका आहे असं साकी यांनी स्पष्ट केलं आहे.

अमेरिकेने ३१ ऑगस्टआधी आपली बचाव मोहीम संपवणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र अडकलेल्या नागरिकांची संख्या पाहता यामध्ये अधिक कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. गरज पडली तर ३१ ऑगस्टनंतरही मोहीम सुरु राहील असं जो बायडेन यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र जशीजशी ही तारीख जवळ येत आहे त्याप्रमाणे काबूल विमानतळावर पुन्हा एकदा घातपात होण्याची भीती व्यक्त केली जातेय.