अफगाणिस्तानमध्ये ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तानातील भूकंपाचे धक्के थेट भारतातील जम्मू-काश्मीर, दिल्ली-एनसीआर आणि पाकिस्तानातही जाणवले आहेत. शनिवारी संध्याकाळी अफगाणिस्तानच्या हिंदू कुश भागात ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील कालाफगानपासून सुमारे ८१ किलोमीटर अंतरावर होता.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, हा भूकंप जमिनीखाली २१५ किमी खोलीवर झाला. उत्तर पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान, या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. मात्र, या भूकंपाचे धक्के अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, चीन आणि तुर्कमेनिस्तानमध्ये जाणवले आहेत. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

भारतात कुठे-कुठे जाणवले भूकंपाचे धक्के?

अफगाणिस्तानच्या हिंदू कुश भागात ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के भारतातील दिल्ली-एनसीआरसह जम्मू-काश्मीरमध्ये जाणवले आहेत. तसेच हिमाचल प्रदेशच्या काही भागात आणि पंजाबच्या काही भागात या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

पाकिस्तानात २४ तासांत ४ भूकंपांची नोंद

वृत्तानुसार, पाकिस्तानात गेल्या २४ तासांत ४ भूकंपांची नोंद झाली आहे. शुक्रवारी २४ तासांच्या कालावधीत पाकिस्तानमध्ये चार भूकंपांचे धक्के जाणवले. यातील सर्वात तीव्र भूकंपाची तीव्रता ५.५ एवढी होती. तसेच शनिवारी सकाळी ८:३६ वाजता पुन्हा तीव्र भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागात होता.

व्हेनेझुएला भूकंपातील मृतांचा आकडा ५८९वर

व्हेनेझुएलामध्ये बुधवारी लागोपाठ झालेल्या दोन भूकंपांमध्ये आतापर्यंत ५८९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारने दिली. त्याशिवाय शुक्रवार सकाळपर्यंत बेपत्ता व्यक्तींची संख्या ५० हजार नोंदवण्यात आली. भूकंपग्रस्त भागांमध्ये बचावकार्यासाठी परदेशी पथके पोहोचत आहेत. व्हेनेझुएलाची राजधानी काराकासमध्ये आणि लगतच्या प्रदेशांमध्ये दुहेरी भूकंपांमुळे मोठे नुकसान होऊन अनेक इमारती आणि बांधकामे जमीनदोस्त झाली आहेत. ढिगाऱ्याखाली अजून शेकडो लोक अडकले असल्याचा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे. आतापर्यंत ५८९ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली असून २,९८० जण जखमी झाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.