तालिबानने ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये भयंकर संकट आलं आहे. आधिच अफगाणिस्तान आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानात भूक आणि बेरोजगारीच्या समस्येचं मोठं आव्हान बनलं आहे. अफगाणिस्तानमधील २२ दशलक्षहून अधिक लोकांना या हिवाळ्यात तीव्र अन्न असुरक्षिततेचा सामना करावा लागेल, असा इशाला संयुक्त राष्ट्राने दिला आहे. 

या हिवाळ्यात, लाखो अफगाणींना स्थलांतर आणि उपासमार यापैकी एक पर्याय निवडण्यास भाग पाडले जाईल, असे वर्ल्ड फूड प्रोग्रामचे कार्यकारी संचालक डेव्हिड बीस्ले यांनी सांगितले. अशा परिस्थितीत, जीवन रक्षण सहाय्य वाढवण्याची गरज भासणार आहे. वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या अधिकाऱ्यांच्या मते, येमेन किंवा सीरियापेक्षा हे संकट मोठ्या प्रमाणावर आहे.

अफगाणिस्तानला आता जगातील सर्वात वाईट मानवतावादी संकटाचा धोका आहे. देशातील अन्नसुरक्षा पूर्णपणे कोलमडली आहे. देश उध्वस्त होण्याच्या काउंटडाउनवर आहे आणि जर आत्ताचं कारवाई केली नाही तर अफगाणिस्तानला मोठ्या आपत्तीचा सामना करावा लागेल, असे डेव्हिड बीस्ले यांनी एका निवेदनात म्हटले आहे. 

अफगाणिस्तान आधीच २० वर्षांच्या गृहयुद्धातून सावरण्यासाठी संघर्ष करत आहेत. दरम्यान, देश उपासमार, बेरोजगारी, आर्थिक व्यवस्थापन या समस्येतून जात आहे. विशेष म्हणजे, ऑगस्टमध्ये कट्टरपंथी इस्लामी तालिबानने अफगाणिस्तानमधील यूएस-समर्थित राजवट उलथून टाकली आणि अंतरिम सरकारची घोषणा केली आणि तेव्हापासून ते स्थिरता पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

संयुक्त राष्ट्राने तालिबानला सुनावलं!

गेल्या दोन महिन्यांपासून अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट आहे. मात्र, अजूनही तालिबानच्या अधिपत्याखाली असलेल्या अफगाणिस्तान सरकारला जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर तालिबानी सरकारच्या शिष्टमंडळाने पहिल्यांदाच अमेरिकन सरकारशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर त्यावर संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटेरस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीवर भाष्य करताना गुटेरस यांनी तालिबान्यांना स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. तसेच, इतर देशांनी अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी हातभार लावणं आवश्यक असल्याचं देखील त्यांनी नमदू केलं आहे.

अँटोनियो गुटेरस यांनी सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये अफगाणिस्तानमधील परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. विशेषत: अमेरिकेसोबत तालिबानी सरकारच्या शिष्टमंडळाच्या पहिल्या भेटीमध्ये अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आल्यानंतर या मुद्द्यावर गुटेरस यांनी तालिबानला स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. “मला अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींची जास्त चिंता वाटते आहे. तालिबानींनी या दोन्ही गटांना दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत. त्यांनी दिलेलं वचन मोडलं आहे”, असं गुटेरस म्हणाले आहेत.