गुजरातमधील एका बंदरातून सुमारे तीन टन हेरॉईन जप्त करण्यात आली आहे. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल १९ हजार कोटी रुपये आहे. गुजरातमधील मुंद्रा बंदरावर दोन कंटेनरमध्ये ठेवलेले हेरॉईन महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केले आहे. हे हेरॉईन अफगाणिस्तानमधून इराणमार्गे भारतात पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच या कारवाईत दोन जणांना अटकही करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.

डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, एका कंटेनरमध्ये जवळपास २ हजार किलो हेरॉईन आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये १ हजार किलो हेरॉईनची खेप अफगाणिस्तानातून आली होती. हे कंटेनर इराणमधील एका बंदरातून गुजरातला पाठवण्यात आले होते. माहिती मिळाल्यानंतर गुजरातमधील अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, गांधीधाम आणि मांडवी येथे शोध मोहीम राबवण्यात आली. त्याच दरम्यान मुंद्रा बंदरावर हे हेरॉईन जप्त करण्यात आले, असे एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे. तसेच या हेरॉईनची किंमत १९,९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या हेरॉईन तस्करीच्या प्रकरणात अफगाण नागरिक कथितपणे सहभागी असल्याचंही तपासात उघड झालं आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे डीआरआयने सांगितले.

अफगाणिस्तान जगातील सर्वात मोठा हेरॉईन उत्पादक असून तो एकटा जागतिक उत्पादनाच्या ८०-९० टक्के उत्पादन करून पुरवठा करतो. अफगाणिस्तानमध्ये अलीकडच्या वर्षांत हेरॉईनचे उत्पादन झपाट्याने वाढले आहे. त्याचाच फायदा तालिबान्यांना झाल्याचं म्हटलं जातंय. हेरॉईन मधून मिळणाऱ्या नफ्यामुळे तालिबान्यांना आर्थिक मदत झाली आणि ते अफगाणिस्तानवर ताबा मिळवू शकले.