अफगाणिस्तानमध्ये संपूर्ण देशाचे बजेट पाहणाऱ्या अर्थमंत्र्यांना आता वॉशिंग्टन डीसीमध्ये टॅक्सी चालक म्हणून काम करावे लागत आहे. खालिद पायेंदा यांनी अफगाणिस्तानचे अर्थमंत्री या नात्याने एकेकाळी ६ अब्ज डॉलरचा अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र अफगाणिस्तानातील बिघडलेल्या परिस्थितीनंतर कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी त्यांना उबर कॅब चालवावी लागत आहे. गेल्या वर्षी, तालिबानने देशाचा ताबा घेण्यापूर्वी, पायेंदा अफगाणिस्तानातून अमेरिकेत पळून गेले होते.
वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, खालिद पायेंदा म्हणाले की, “या कामामुळे त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे. याबद्दल मला खूप कृतज्ञ वाटते. म्हणजे मला हताश होण्याची गरज नाही.” उबेरमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करण्याव्यतिरिक्त, पायेंदा जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतात आणि अधूनमधून थिंक-टँक मीटिंगमध्ये भाषण देतात.
खालिद पायेंदा आता जॉर्जटाउन विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही काम करतात आणि वॉशिंग्टन आणि आसपास उबेर कॅब देखील चालवतात. सहाय्यक प्राध्यापक म्हणून, त्यांना प्रति सेमिस्टर २,००० डॉलर मिळतात. पैसे कमवण्यासाठी कॅब ड्रायव्हर म्हणून काम करतात, ज्यामुळे त्यांना त्यांची पत्नी आणि चार जणांच्या कुटुंबाला मदत होते.
अफगाणिस्तान सध्या आर्थिक आणि मानवतावादी संकटातून जात आहे आणि अनेक देश अमेरिका समर्थित सरकार उलथून टाकणाऱ्या तालिबान सरकारला पाठिंबा देण्यास टाळाटाळ करत आहेत. माजी पंतप्रधान अश्रफ घनी यांच्याशी बिघडलेल्या संबंधांमुळे तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी ताब्यात घेण्याच्या आठवडाभर आधी पायेंदा यांनी देशाच्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. गेल्या वर्षी १० ऑगस्ट रोजी त्यांनी ट्विट केले होते की, “आज मी देशाच्या कार्यवाहक अर्थमंत्री पदाचा राजीनामा देत आहे. अर्थमंत्रालय सांभाळण्याची संधी मिळणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान होता, परंतु राजीनामा देण्याची आणि वैयक्तिक प्राधान्यक्रम पाहण्याची हीच वेळ आहे.” सरकारकडून अटक होण्याच्या भीतीने ते देश सोडून अमेरिकेत आपल्या कुटुंबाकडे गेले होते.
अफगाणिस्तानवर तालिबानच्या ताब्याला अमेरिकन सरकार जबाबदार आहे, असे पायेंदाचे स्पष्ट मत आहे. गेल्या दोन दशकांच्या संघर्षानंतर अमेरिकेने ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेतले. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेण्याच्या काही महिन्यांपूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये दहशतवादी गटाशी सशर्त शांतता करारावर स्वाक्षरी केली. ज्यामध्ये पुढील १४ महिन्यांत अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याला बाहेर काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या करारात तत्कालीन अफगाण सरकारचा समावेश नव्हता.
२० वर्षांपूर्वी लोकशाही, मानवाधिकार आणि महिला हक्कांच्या तथाकथित आश्वासनांसह सुरू झालेले अफगाणिस्तान युद्ध संपवायचे होते. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांच्याशी पायेंदाचे संबंध काही मुद्द्यांवरून बिघडले आणि तालिबानने काबूलवर ताबा मिळवण्याच्या एक आठवडा आधी त्यांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला. राष्ट्राध्यक्ष घनी आपल्याला तुरुंगात टाकतील या भीतीने ते पुन्हा आपल्या कुटुंबाकडे अमेरिकेला पळून गेले.