“तालिबानींच्या पाक पुरस्कृत अत्याचाराला…”, वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानच्या पहिल्या विजयानंतर माजी उपराष्ट्राध्यक्षांची प्रतिक्रिया!

विश्वचषकातील पहिल्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी राष्ट्रगीत गायल्यानंतर त्यावर अमरुल्लाह सालेह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

amrullah saleh on afghanistan cricket team national anthum in t20 world cup
अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी विश्वचषकात राष्ट्रगीत गायल्यानंतर अमरुल्लाह सालेह यांनी साधला निशाणा

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानचा संघ सहभागी झाला आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. तीन महिन्यांपूर्वीच १५ ऑगस्ट रोजी तालिबानींनी अफगाणिस्तानमधलं सरकार उलथून टाकत तिथे आपला अंमल प्रस्थापित केला होता. यानंतर अफगाणिस्तानमधील सर्वच व्यवस्था बदलत असताना या काळात अफगाणिस्तानचा संघ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सहभागी झाल्यामुळे सगळ्यांच्या नजरा या संघाकडे वळल्या. आपल्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्ताननं स्कॉटलंडला पराभवाची धूळ चारल्यानंतर तालिबानी राज्यकर्त्यांनी त्यावर स्तुतिसुमनं उघळली. मात्र, त्याचवेळी अफगाणिस्तानच्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. याचं वर्णन करताना अफगाणिस्तानच्या पदच्युत सरकारमधील उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी तालिबान्यांवर निशाणा साधला आहे.

अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघानं स्कॉटलंडला सोमवारी झालेल्या टी-२० वर्ल्डकप सामन्यामध्ये पराभूत केलं. यानंतर अफगाणिस्तानमधील तालिबानी सत्ताधाऱ्यांच्या अनेक प्रतिनिधींनी ट्विटरवरून अफगाणिस्तानच्या संघाला शुभेच्छा दिल्या. मात्र, त्याचवेळी माजी उपराष्ट्राध्यक्षांनी यावरून तालिबानी राज्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे.

अमरुल्लाह सालेह यांनी अफगाणिस्तानचा संघ देशाचं राष्ट्रगीत म्हणतानाचा व्हिडीओ रीट्वीट केला आहे. यावर ते म्हणतात, “आपले क्रिकेट हिरो आणि त्यांच्या देशाच्या मूल्यांसाठी असलेल्या बांधिलकीला मी सलाम करतो. त्यांनी अफगाणिस्तानचं राष्ट्रगीत गायलं आणि आपला राष्ट्रध्वज फडकावला. पाकिस्तान पुरस्कृत तालिबान्यांच्या अत्याचारांना त्यांनी दिलेलं हे सडेतोड उत्तर आहे. तालिबानींच्या सत्तेला स्वत:चा आवाजत नाहीये आणि यांच्या सत्तेमध्ये कोणतीही पार्श्वभूमी नसलेला पंतप्रधान आहे”.

अमरुल्लाह सालेह यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अफगाणिस्तानचे खेळाडू आपल्या देशाचं राष्ट्रगीत गाताना दिसत आहेत. सामन्यापूर्वीचा हा व्हिडीओ असून त्यामध्ये राष्ट्रगीतानंतर कर्णधार मोहम्मद नबीला अश्रू अनावर झाल्याचं दिसून येत आहे.

तालिबानींच्या शुभेच्छा!

अफगाणिस्तानच्या विजयानंतर तालिबानी सत्ताधाऱ्यांकडून संघाला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. अफगाणिस्तानचा केंद्रीय मंत्री सिराजुद्दीन हक्कानीचा धाकटा भाऊ अनस हक्कानीनं “अफगाणिस्तानचा विजय झाला”, अशी प्रतिक्रिया देणारं ट्वीट केलं आहे.

तालिबानचा संयुक्त राष्ट्रांमधला प्रतिनिधी सुहेल शाहीननं ट्वीट करत आपल्या संघाच्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. “स्कॉटलंडविरुद्ध मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ आणि संपूर्ण अफगाणिस्तानचं अभिनंदन. पुढील विजयासाठी देखील अल्लाह तुम्हाला आशीर्वाद देवो”, असं ट्वीट त्यानं केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Afghanistan wins against scotland sings national anthum amrullah saleh targets taliban pmw

Next Story
मच्छरांसाठी लावलेल्या कॉईलमुळे घराला आग लागून चार जणांचा मृत्यू
फोटो गॅलरी