scorecardresearch

महिलांनी बुरखा घालून ऑफिसला जाणंही तालिबानला रुचेना; त्यांचा कमांडर म्हणतो, “जगाने जरी…”

येणाऱ्या काळात महिलांना काम करण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी वेगळी केंद्रं उभारली जातील, जिथे फक्त महिलांचा वावर असेल, असंही सांगण्यात आलं आहे.

महिलांनी बुरखा घालून ऑफिसला जाणंही तालिबानला रुचेना; त्यांचा कमांडर म्हणतो, “जगाने जरी…”

अफगाणिस्तानात सरकार प्रस्थापित करण्यापूर्वी केलेल्या दाव्यांप्रमाणे तालिबानचं वागणं दिसत नाही. आमच्या राज्यात महिलांना पूर्ण स्वातंत्र्य असेल असं म्हणणाऱ्या तालिबानने आता महिलांना ऑफिसला जाण्यालाही विरोध केला आहे. तालिबानने आता स्पष्ट केलं आहे की, महिलांना बुरखा घालूनही ऑफिसला जाता येणार नाही.

तालिबानने म्हटलं आहे की, महिलांना पुरुषांसोबत काम करु दिलं जाणार नाही, देशात पूर्णपणे शरिया कायदा लागू केला जाईल. रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना तालिबानचा कमांडर वहीदुल्लाह हाशिमीने ही माहिती दिली. तो म्हणाला की, जगाने जरी आमच्यावर महिलांना काम करण्याचं स्वातंत्र्य देण्याबद्दल दबाव निर्माण केला तरीही अफगाणिस्तानात फक्त शरिया कायद्यानुसारच काम होईल.

हेही वाचा – अफगाणिस्तान : नोकरदार महिलांना तालिबानने सांगितलं, घरीच थांबा कारण…

जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं होतं, तेव्हा त्यांनी असा दावा केला होता की महिलांना शरिया कायद्यानुसार काम करण्याची परवानगी दिली जाईल. मात्र, एका महिन्यातच तालिबानने आपल्या दाव्यापासून फारकत घेतल्याचं दिसून येत आहे.

हाशिमीने सांगितलं की, आम्ही ४० वर्षे फक्त यासाठीच लढलो की आम्हाला देशात शरिया कायदा लागू करायचा होता. शरिया कायदा महिला आणि पुरुषांना एकत्र काम करण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे महिला पुरुषांसोबत काम तर करु शकत नाहीतच, मात्र त्यांना आमच्या कार्यालयांमध्येही येण्याची परवानगी नाही.
हाशिमी पुढे म्हणाला, ज्या क्षेत्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर महिला काम करत आहेत, तिथून त्यांना हटवण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात महिलांना काम करण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी वेगळी केंद्रं उभारली जातील, जिथे फक्त महिलांचा वावर असेल.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-09-2021 at 11:53 IST

संबंधित बातम्या