Aftab eight hour polygraph test Five knives seized from the flat crime news ysh 95 | Loksatta

Shraddha Walker murder case: आफताबची आठ तास ‘पॉलीग्राफ’ चाचणी; सदनिकेतून पाच चाकू जप्त

श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी तिचा प्रियकर आफताब पूनावालाची गुरुवारी नवी दिल्लीतील जैवविज्ञान प्रयोगशाळेत ‘पॉलीग्राफ’ चाचणी करण्यात आली.

Shraddha Walker murder case: आफताबची आठ तास ‘पॉलीग्राफ’ चाचणी; सदनिकेतून पाच चाकू जप्त

पीटीआय, नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी तिचा प्रियकर आफताब पूनावालाची गुरुवारी नवी दिल्लीतील जैवविज्ञान प्रयोगशाळेत ‘पॉलीग्राफ’  चाचणी करण्यात आली. सुमारे आठ तास ही चाचणी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र काही माहिती अपूर्ण आल्याने शुक्रवारी पुन्हा चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान, आफताबच्या नवी दिल्लीतील सदनिकेतून पोलिसांनी पाच चाकू जप्त केले असून हे चाकू हत्येसाठी वापरण्यात आले की नाही याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

एफएसएल रोहिणी येथे दुपारी १२ वाजता पूनावालाची ‘पॉलीग्राफ’ चाचणी सुरू झाली. त्याला ४० प्रश्न विचारण्यात आल्याचे जैवविज्ञान प्रयोगशाळेच्या संचालिका दीपा वर्मा यांनी सांगितले. पूनावाला यांनी चाचणीदरम्यान सहकार्य केले. परंतु काही रेकॉर्डिग स्पष्ट झाले नाही, कारण त्याला सातत्याने शिंका येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिंक येत आहे. पूनावाला याला ताप आणि सर्दी असल्याने बुधवारी चाचणी झाली नव्हती.

या चाचणीत पूनावालाला या प्रकरणाचा तपशील विचारण्यात आला. श्रद्धाला मारण्यासाठी तो कशामुळे प्रवृत्त झाला, हा नियोजित कट होता की न्यायालयात दावा केल्याप्रमाणे रागाच्या भरात हे कृत्य केले या प्रश्नासह घडलेल्या सर्व क्रम आणि मृतदेहाची विल्हेवाट कशा प्रकारे लावली याबाबत त्याला प्रश्न विचारण्यात आले. तिच्या शरीराचे अनेक तुकडे करण्यासाठी त्याने कोणत्या शस्त्राचा वापर केला होता, ज्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास होऊ शकेल याबाबत माहिती विचारण्यात आल्याचे समजते. पूनावालाने श्रद्धाचा मृतदेह कापण्यासाठी कथितपणे वापरलेली करवत अद्याप सापडलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पूनावालाच्या सदनिकेत सापडलेले चाकू जैवविज्ञान प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या चाकूंचा वापर गुन्ह्यासाठी करण्यात आला होता का, जैवविज्ञान तपासणीनंतरच कळेल, ज्यात वेळ लागेल, असे पोलिसांनी सांगितले.

कडक कारवाई होईल – शहा

नवी दिल्ली : श्रद्धा वालकरची हत्या करणाऱ्याला कमीत कमी वेळेत कठोर शिक्षा व्हावी, यासाठी दिल्ली पोलीस आणि सरकारी वकील पूर्ण प्रयत्न करतील, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिली. आफताब पूनावालाविरोधात श्रद्धाने २०२० मध्ये महाराष्ट्र पोलिसांना दिलेल्या पत्रावर कोणतीही कारवाई का झाली नाही, याचीही चौकशी करण्यात येईल, असे ते म्हणाले. ‘या प्रकरणावर माझे लक्ष आहे. हे कृत्य ज्याने केले आहे, त्याला कायदेशीर मार्गाने कठोर शिक्षा व्हावी, यासाठी दिल्ली पोलीस आणि सरकारी वकील पूर्ण प्रयत्न करतील,’ असे अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सांगितले. दिल्ली आणि मुंबई पोलिसांमध्ये कोणताही असमन्वय नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘आफताब आपली हत्या करून शरीराचे तुकडे करील, अशी तक्रार श्रद्धाने आधी केली होती. मात्र, महाराष्ट्रात त्यावर काही कारवाई झाली नाही.. याची चौकशी केली जाईल. त्या वेळी तेथे आमचे सरकार नव्हते. मात्र, याला जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई केली जाईल,’ असे ते म्हणाले.

धर्मातरबंदी कायद्याबाबत राज्यांनी निर्णय घ्यावा

देशात धर्मातरबंदी कायद्याची गरज आहे का, या प्रश्नावर बोलताना शहा यांनी भाजपशासित राज्यांत असे कायदे आधीपासूनच अस्तित्वात आले असल्याचे सांगितले.

श्रद्धाच्या मोबाइलचा भाईंदर खाडीत शोध

वसई : श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर आफताबने तिचा मोबाइल फोन भाईंदरच्या खाडीत फेकल्याची माहिती गुरुवारी पोलिसांनी दिली. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी दुपारी भाईंदरच्या खाडीत मोबाइल शोधण्याची मोहीम हाती घेतली. दोन पाणबुडय़ांच्या सहाय्याने तब्बल ५ तास ही शोधमोहीम सुरू होती. मात्र पोलिसांच्या हाती काही लागले नाही. श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिचा मोबाइल आफताबकडेच होता. ऑक्टोबर महिन्यात माणिकपूर पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केल्यानंतर तो सावध झाला होता. याच काळात त्याने वसईला असताना तिचा मोबाइल भाईंदर खाडीत फेकल्याची माहिती दिल्ली पोलिसांना तपासादरम्यान मिळाली होती. या गुन्ह्याच्या अनुषंगाने श्रद्धाचा मोबाइल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी खाडीत फेकलेला मोबाइल शोधण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला. त्यांचे एक पथक मागील आठवडय़ापासून वसईत आले. माणिकपूर पोलिसांच्या मदतीने गुरुवारी दुपारी २ वाजता ही मोहीम हाती घेण्यात आली. या कामासाठी दोन पाणबुडय़ाना पाचारण करण्यात आले होते. दुपारी २ ते संध्याकाळी ७ अशा वेळेत ही मोहीम सुरू होती. मात्र पोलिसांच्या हाती काही लागले नाही. आम्ही या कामात दिल्ली पोलिसांना मदत केली, अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली.

श्रद्धाला सिगारेटचे चटके

आफताब हा श्रद्धाला सिगारेटचे चटके देत होता, अशी माहिती पुढे आली आहे. त्याविरोधात श्रद्धाला पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला तिच्या मित्राने दिला होता. मात्र श्रद्धाला त्याला आणखी एक संधी द्यायची होती. म्हणून तिने   जाण्याचे टाळले, असा दावा तिच्या एका मित्राने गुरुवारी केला. आफताबसोबत नातेसंबंधात आल्यानंतर श्रद्धाने स्वत:ला तिच्या कुटुंबापासून दूर केले, असे या मित्राने सांगितले. २०२१मध्ये श्रद्धाने तिच्या एका जवळच्या मैत्रिणीला सांगितले की, आफताबने तिच्या पाठीवर सिगारेटचे चटके दिले. त्यानंतर या मैत्रिणीने आफताबची भेट घेऊन त्याला पोलिसांत जाण्याची धमकी दिली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-11-2022 at 01:09 IST
Next Story
जामा मशिदमधील महिलांच्या प्रवेशबंदीचा आदेश मागे; नायब राज्यपालांच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनाचा निर्णय