Aftab Poonawalla Tihar Jail Threat: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी आफताब अमीन पूनावाला याच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. इतर कैद्यांकडून चेहऱ्यावर वार करण्याची धमकी दिली जात असल्याचा दावा आफताबने न्यायालयात केला. या दाव्याची गंभीर दखल घेत दिल्ली न्यायालयाने सोमवारी तिहार कारागृह प्रशासनाला त्याच्या सुरक्षेसाठी तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले.
या खटल्यातील सरकारी पक्षाच्या साक्षी नोंदवून घेत असताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरगुरवरिंदर सिंग जग्गी यांच्यासमोर आरोपीने ही तक्रार मांडली. गेल्या दहा दिवसांपासून काही कैदी आपल्याला सातत्याने धमकावत असून हाताने तयार केलेल्या धारदार हत्यारांनी आपल्या चेहऱ्यावर वार करण्याची आणि शारीरिक इजा पोहोचवण्याची धमकी देत असल्याचे आफताबने न्यायालयाला सांगितले.
स्वतंत्र बराकीत ठेवण्याचे निर्देश
न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद केले आहे की, संबंधित कारागृह अधीक्षकांनी आरोपीच्या सुरक्षिततेसाठी तातडीने योग्य ती खबरदारी घ्यावी. गरज भासल्यास, आरोपीला कुख्यात कैद्यांपासून दूर स्वतंत्र वॉर्ड अथवा बराकीत हलवण्यात यावे.” या संदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा, असे आदेशही अधीक्षकांना देण्यात आले आहेत.
सध्या आपल्याला तिहार कारागृहातील जेल क्रमांक ४ए मध्ये ठेवण्यात आले असून, हा एक विशेष कक्ष व शिक्षा वॉर्ड आहे, अशी माहिती पूनावालाने न्यायालयात दिली. तिथे आपल्या जिवाला गंभीर धोका असल्याचे त्याने नमूद केले.
‘कैद्यांची सुरक्षा ही राज्याची जबाबदारी’
न्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवताना स्पष्ट केले की, न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याची सुरक्षा ही फौजदारी न्यायव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाची प्राथमिकता आणि मूलभूत तत्त्व आहे. खटल्याचा सामना करणाऱ्या कैद्यांचे रक्षण करणे ही राज्याची जबाबदारी असून, निष्पक्ष सुनावणीच्या अधिकाराचाच हा एक भाग आहे.”
आरोपीने धमकी देणाऱ्या पाच कैद्यांची नावे न्यायालयासमोर उघड केली. मात्र, गोपनीयता राखण्यासाठी आणि आरोपीच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही नावे न्यायालयीन कामकाजाच्या नोंदीतून वगळण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या आदेशाची प्रत तिहार कारागृह प्रशासन आणि तपास अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
मे २०२२ मध्ये २७ वर्षीय कॉल सेंटर कर्मचारी श्रद्धा वालकर हिची तिच्यासोबत ‘लिव्ह-इन’मध्ये राहणाऱ्या आफताब पूनावाला याने निर्घृण हत्या केली होती. आफताबने गळा आवळून तिची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. हे तुकडे त्याने काही दिवस फ्रीजमध्ये ठेवले आणि नंतर टप्प्याटप्प्याने दिल्लीतील विविध जंगलांमध्ये फेकून दिले, असा सरकारी पक्षाचा आरोप आहे.
याप्रकरणी १२ नोव्हेंबर २०२२ रोजी मेहरौली भागातून आफताबला अटक करण्यात आली होती. २०२३ पासून या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. दरम्यान, आपल्या मुलीला न्याय मिळावा म्हणून सातत्याने लढा देणारे श्रद्धाचे वडील विकास वालकर यांचे २०२५ मध्ये निधन झाले.
