ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने १० ऑक्टोबरला जंतर-मंतरहून आंदोलनाची हाक दिली. मात्र आशुतोष रांका, अभिजीत दिपके आणि सौरव दास या तिघांना दिल्ली पोलिसांनी विमानातूनच ताब्यात घेतलं होतं. या तिघांची पोलिसांनी २३ तासांनी सुटका केली. त्यानंतर आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी त्यांची बाजू मांडली. अभिजीत दिपके यांची आजी गेल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कशी वागणूक दिली याबाबतचे आरोप आशुतोष रांका यांनी केले आहेत. मात्र दिल्ली पोलिसांनी ते आरोप खोडून काढले आहेत.
आशुतोष रांका यांनी काय म्हटलंय?
७२ तासांत नरेंद्र मोदींनी जी वागणूक मुलांना दिली, आंदोलकांना दिली त्यामुळे त्यांनी लाज आणली आहे. हुकूमशाहीचा नंगानाच संपूर्ण देशाने पाहिला आहे. जे आंदोलक शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार होते त्यांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांना मारहाण करण्यात आली. आम्ही म्हणजे मी, सौरव आणि अभिजीत दिपके विमानाने आलो तेव्हा विमानातूनच आमचं अपहरण करण्यात आलं.
अभिजीत दिपके यांच्याशी अमानवीय वर्तन
आशुतोष रांका पुढे म्हणाले की, अभिजीत दिपकेच्या आजीचं निधन झालं. याबाबतची माहिती देताना दिपके यांच्याशी जी काही चर्चा चालली होती त्याचं दिल्ली पोलिसांनी व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं. अभिजीतला जेव्हा पोलीस ही बातमी सांगायला आले तेव्हा दिल्ली पोलिसांचा अमानवी चेहरा दिसला. दिपके यांना त्याच्या आजीच्या निधनाची बातमी सांगितली तेव्हा दिल्ली पोलिसांच्या हाती कॅमेरा आणि माईक होता. दिपके यांनी सांगितलं की मला माझे आई वडील संवेदनशील आहेत, ते हार्ट पेशंट आहेत, मला माझ्या आई वडिलांची काळजी वाटते. मला तुम्ही माझ्या भावाशी बोलणं करून द्या. पण दिल्ली पोलिसांनी फोन करू दिला नाही. अशा पद्धतीचं वातावरण तिथे होतं. आज सुटकेनंतर दिपके हे त्यांच्या आजीच्या अंत्यसंस्कारांसाठी गेले आहेत. असा आरोप रांका यांनी केला. पण दिल्ली पोलिसांनी हे आरोप खोडले आहेत.
दिल्लीच्या डीसीपी नेहा यादव काय म्हणाल्या?
दिल्ली पोलिसांना जेव्हा अभिजीत दिपकेंच्या आजीच्या निधनाची बातमी समजली तेव्हा ती देण्यासाठी दिल्ली पोलीस दिपकेंच्या जवळ गेले आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन दिलं. फ्लाईट, कॉल्स किंवा जी आवश्यकता आहे ती मदत आम्ही करू असं त्यांना सांगितलं. आम्ही दिपकेंना असंही सांगितलं की तुमची इच्छा असेल तर आई वडिलांशीही बोलणं करून देतो. मात्र अभिजीत दिपके यांनी संमती दिली नाही. त्यांनी निधनाची बातमी ऐकल्याने आम्ही त्यांना विचार कऱण्यासाठीचा वेळही दिला. त्यानंतर पुन्हा काही वेळाने मदतीसंदर्भात विचारणा केली. मात्र सीजेपीच्या पत्रकार परिषदेत हे वास्तव चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं. असं म्हणत त्यांनी एक व्हिडीओही दाखवला. या व्हिडीओत पोलीस अभिजीत दिपके यांना मदत हवी आहे का हे विचारताना दिसत आहेत. सर्व प्रकारचं सहकार्य करायला तयार आहेत असं सांगत आहेत. त्यांना पाणीही देण्यात आलं. हे देखील या व्हिडीओत दिसतं आहे.
मागच्या वेळी सीजेपीने जेव्हा आंदोलन केलं तेव्हा त्यांनी कायद्यातील नियमांचं पालन केलं नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती त्यानंतर हिंसाचार झाला आणि सरकारी संपत्तीची नासधूस मागच्या वेळी झाली होती. त्यामुळे आम्ही यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून जंतर-मंतरवर आंदोलनाची संपत्ती नाकारली होती. असंही त्यांनी सांगितलं आहे.
