Akasa Air : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा आता जगातील अनेक देशांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. अमेरिका-इस्रायल संयुक्तपणे इराणवर हल्ले करत आहेत, तर इराण देखील अमेरिका-इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर देत असल्यामुळे मध्य पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्धामुळे जगातील अनेक देशांना होणारा तेल आणि वायूचा पुरवठा विस्कळीत होण्याची चिन्ह आहेत.

दरम्यान, इराण-इस्रायल युद्धामुळे विमान इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे आता विमान कंपन्या ‘फ्यूल सरचार्ज’ लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच एअर इंडियाने तिकीट दरात वाढ केली होती. १२ मार्चपासून देशांतर्गत प्रवासावर ३९९ रुपये तर आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या तिकीट दरातही मोठी दरवाढ करण्यात येणार असल्याचं एअर इंडियाने सांगितलं होतं.

एअर इंडियानंतर आता अकासा एअरच्या विमानांचाही प्रवास महागला आहे. उद्यापासून अकासा कंपनीही ‘फ्यूल सरचार्ज’ लावणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एअर इंडियानंतर आता अकासा एअरच्या विमानांचाही प्रवास महागला असून इराण-इस्रायल युद्धाचा फटका प्रवाशांना बसत आहे.

एअर इंडिया आणि इंडिगोनंतर अकासा एअरने देखील पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेलाच्या किंमती वाढल्यामुळे विमान तिकिटांवर ‘फ्यूल सरचार्ज’ लावण्याची घोषणा केली आहे. अधिकृत निवेदनानुसार, १५ मार्चपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांवर १९९ रुपयांपासून ते १,३०० रुपयांपर्यंत इंधन अधिभार लागू करणार आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

विमान प्रवास झाला महाग; एअर इंडियाकडून भाडेवाढ जाहीर

एअर इंडिया प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, मार्च २०२६ च्या सुरुवातीपासूनच आखाती प्रदेशात इंधनाचा पुरवठा खंडित झाल्यामुळे विमान इंधनाच्या (एटीएफ) किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे दरवाढ लागू करण्यात येत आहे. तीन फेजमध्ये नवी दरवाढ लागू करण्यात येईल, असेही एअर इंडियाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

तीन फेजमध्ये दरवाढ

फेज एक: देशाअंतर्गत आणि सार्क देशात जाणाऱ्या विमानांसाठी येत्या १२ मार्चच्या बुकिंगपासून भाडेवाढ लागू असेल. सार्क देशांत अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. यासाठी प्रवाशांना ३९९ अधिक पैसे मोजावे लागतील.

फेज दोन: काही आंतरराष्ट्रीय फ्लाईटवर दरवाढ करण्यात येईल. पश्चिम आशिया (१० डॉलर), दक्षिण पूर्व आशिया (२० डॉलर) आणि आफ्रिका (३० डॉलर) भाडेवाढ करण्यात येईल. १८ मार्चपासूनच्या बुकिंगवर ही भाडेवाढ लागू असणार आहे.

फेज तीन : यामध्ये हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरिया यासारख्या देशात जाणाऱ्या फ्लाईट्ससाठी दरवाढ करण्यात येईल, असे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. यासाठी तारीख पुढे जाहीर करण्यात येईल असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.