तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. दरम्यान, या बैठकीनंतर आता केंद्रिय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. एस जयशंकर यावेळी बोलताना म्हणाले की, “अफगाणिस्तान प्रकरणी सरकारसह सर्व राजकीय पक्षांचा समान दृष्टिकोन आहे. त्याचप्रमाणे, अफगाण लोकांशी असलेली मैत्री देखील आपल्यासाठी महत्त्वाची आहे.”

एस जयशंकर पुढे म्हणाले की, “आम्ही ऑपरेशन ‘देवी शक्ती’ अंतर्गत ६ उड्डाणे केली आहेत. आम्ही बहुतेक भारतीयांना परत आणलं आहे पण सर्वांना नाही. कारण त्यांच्यापैकी काही जण उड्डाणाच्या वेळी येऊ शकले नाहीत. आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि सर्वांना बाहेर काढू. आम्ही यावेळी काही अफगाण नागरिकांनाही बाहेर काढलं आहे.”

“सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना अफगाणिस्तानच्या परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. आमचं पूर्ण लक्ष लोकांच्या सुरक्षित स्थलांतरावर आहे. आम्ही लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत”, असं देखील यावेळी एस जयशंकर यांनी यावेळी सांगितलं आहे.