निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भागलपूर येथील पत्रकार परिषदेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, “नितीश कुमार हे इथले वयोवृद्ध नेते आहेत, त्यांना काही बोलायचे असेल तर त्यांना बोलू द्या. वैयक्तिक टीकाटिप्पणी करणे योग्य नाही. ते काही बोलले असतील तर ती त्यांची विचारसरणी आहे. भाजपसोबत कोण काम करत आहे, माझ्या आणि तुमच्या माहितीप्रमाणे नितीश कुमार हे एका महिन्यापूर्वी भाजपसोबतच होते. जर आता नितीश कुमारच जर एखाद्या व्यक्तीला अशाप्रकारे प्रमाणपत्र देत असतील तर हे हास्यास्पद आहे.”

हेही वाचा – प्रशांत किशोर यांनी ‘ते’ चार फोटो ट्वीट करत नितीश कुमारांच्या टीकेला दिलं प्रत्युत्तर

याशिवाय, “१७ वर्षे मुख्यमंत्री राहिल्यानंतर तुम्हाला आठवलं की १० लाख नोकऱ्या दिल्या जाऊ शकतात. अगोदरच दिल्या पाहिजे होत्या. परंतु ठीक आहे आता नितीश कुमार एवढे मोठे नेते आहेत, त्यांना A पासून Z पर्यंत माहिती आहे. दुऱ्यांना ABC पण येत नाही.” असंही प्रशांत किशोर म्हणाले.

याचबरोबर, “मुख्यमंत्री नितीश यांनी १० लाख नोकऱ्या देऊ, असे सांगितले आहे. जर त्यांनी दिल्या तर मग आमच्यासारख्या लोकांसाठी मोहीम राबवायची काय गरज आहे. जर १० लाख नोकऱ्या दिल्या तर त्यांनाच नेता समजून जसं २०१५ मध्ये त्यांचं काम करत होतो, तसंच पुन्हा त्यांचं काम करू आणि त्यांचा झेंडा घेऊन फिरू. वर्षभरात १० लाख लोकांना नोकऱ्या देऊन दाखवा, १२ महिन्यांपैकी एक महिना झाला आहे. १२ महिन्यानंतर त्यांना विचारू की कुणाला ABC चे ज्ञान आहे आणि कोणाला XYZ चे ज्ञान आहे. जर १० लाख नोकऱ्या दिल्या तर मान्य करू की तुम्ही सर्वव्यापी आणि सर्वज्ञ आहात “