धुरंधर आणि धुरंधर २ या दोन चित्रपटांची सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा आहे. दरम्यान धुरंधर २ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे सगळे रेकॉर्ड मोडणार असं दिसतं आहे. दरम्यान या चित्रपटातील एक गोष्ट इतिहासात घेऊन जाणारी आहे. दाऊद आणि रहमान डकैत यांच्यातल्या शत्रुत्वाची ही गोष्ट आहे. जागेचा व्यवहार हा गँगवॉरमध्ये बदलल्याची ही गुन्हेगारी विश्वातली काळी कहाणी आहे.

जमिनीचा व्यवहार आणि गँगवॉर

रक्तरंजित गोष्ट सुरु झाली ती २००९ मध्ये, तेदेखील एका जमिनीवरुन. दाऊद इब्राहीम त्याच्या गुन्हेगारी विश्वाचा बेताज बादशाह झाला होता. त्याच्या डी कंपनीचे पंख पसरवत होता. अशातच त्याची नजर कराचीतल्या एका जमिनीवर पडली. या जमिनीची किंमत कोट्यवधींच्या घरात होती. असं सांगितलं जातं की ही जमीन अंदाजे १०० ते ४०० कोटींच्या घरात होती. व्यावसायिक वापरासाठी ही जागा घेतली गेली तर त्या ठिकाणी मॉल बांधता येणं सहज शक्य होतं. मात्र ही जमीन १ कोटी रुपये देऊन विकत घ्यायचा दाऊदचा मनसुबा होता. तर काही लोक असंही सांगतात की दाऊदने १२ कोटींची ऑफर दिली होती. या जमिनीच्या मालकावर दबाव आणला जात होता. मात्र या मालकाने याबाबत रहमान डकैतला सांगितलं. त्यावेळी या मालकाला अशी धमकी देण्यात आली की जे पैसे देत आहोत ते घे नाहीतर जमीन आणि पैसे दोन्ही विसरुन जा. या व्यवहारात तोपर्यंत रहमान डकैत पडला होता. त्याने दाऊदच्या माणसाला थेट सांगितलं की जमिनीच्या मालकापासून दूर राहा. त्यावेळी या माणसाने रहमान डकैतला शिव्या दिल्या. जी गोष्ट रहमान डकैतला मुळीच आवडली नाही. रहमान डकैतसाठी तो फक्त जमिनीचा नाही तर स्वतःच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला, कारण ल्यारीवर राज्य करणाऱ्या रहमान डकैतचा अहंकार दुखावला गेला होता. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

underworld don dawood Ibrahim
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम

रहमान डकैतने काय केलं?

या प्रकरणानंतर रहमान डकैतने दाऊदचा भाऊ नूर उल हक इलियास नुराला उचललं. त्याला एका फार्महाऊसला ठेवलं. तिथे त्याचा शारिरीक छळ सुरु केला. काही वृत्तांनुसार रहमान डकैतने दाऊदच्या भावाला म्हणजेच नुराला सिगारेटचे चटके दिले होते. तर त्याची माणसं रोज नुराला शिव्या घालत होती. यानंतर एक फोन कॉल आला. त्या फोनवर दाऊद होता. रहमान डकैतला त्याने सांगितलं की माझ्या भावाला सोडून दे. पण रहमानने ऐकलं नाही, त्याने फोनवर नुराच्या किंकाळ्या दाऊदला ऐकवल्या. दाऊदने रहमानच्या माणसाला धमक्या दिल्या होत्या. आता दाऊदचा भाऊ संकटात होता आणि रहमान डकैत नुराला छळत होता. दाऊदने नुराला सोडवण्यासाठी रहमानला विनंती केली. पण रहमानने काहीही ऐकून घेतलं नाही. तुला ६०० कोटी देईन असंही दाऊदने शेवटी सांगितलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

Award Banner

दाऊदने विनंती केली पण नुराची हत्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आली

दाऊद नुराला वाचवण्यासाठी फोनवरुन प्रयत्न करत होता. पण रहमान डकैतने नुराला संपवलं. त्याच्यावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या, त्याच्या शरीराची अक्षरशः चाळण करण्यात आली. अनेकांनी नुराच्या डोक्यावर गोळ्या झाडल्या. त्याच्या शरीरावर शारिरीक छळाच्या खुणा होत्याच पण गोळ्याही इतक्या झाडल्या गेल्या की त्या मोजताही येऊ नयेत. त्यानंतर असं सांगितलं जातं की दाऊदच्या घराजवळच नुराचा दफनविधी उरकण्यात आला. माझा भाऊ नुरा हार्ट अटॅकने गेला अशी बातमी दाऊदने पसरवली. त्याच्या कुटुंबातही हीच बातमी पसरवली गेली. पण गुप्तचर यंत्रणांनी हा दावा नाकारला. दाऊदचा भाऊ नुरा याला रहमान डकैतने अत्यंत क्रूरपणे संपवलं होतं. रहमान डकैतने दाऊदला शह दिल्याच्या चर्चा तेव्हा ल्यारीमध्ये रंगल्या होत्या.

रहमानच्या वाटेला दाऊद नंतर गेला नाही

रहमान डकैत आणि त्याच्या गँगच्या वाटेला त्यानंतर दाऊद गेला नाही. कारण या घटनेने दाऊद हादरला होता. भावाला गमावलं हे दुःख दाऊदला होतंच पण ज्या पद्धतीने सगळा घटनाक्रम घडला तो पाहता आपल्याला टक्कर दिली गेली हे त्याच्या मनाला जास्त लागलं. रहमान डकैतने दाऊदला थेट आव्हान दिलं आणि त्याच्या भावाला टॉर्चर करत त्याची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली. रहमान डकैतला त्यावेळी ल्यारीचा रॉबिन हुड म्हटलं जायचं. असं असलं तरीही रहमानचा उदय झाला तेव्हाच त्याच्या अस्ताची बीजं रोवली गेली होती.

नुराच्या हत्येनंतर रहमान डकैतचाही अंत

रहमान डकैतची ल्यारीमध्ये दहशत होती आणि दबदबाही होताच. ऑगस्ट २००९ मध्या SSP चौधरी अस्लमने रहमान डकैतला एन्काऊंटरमध्ये टिपलं. पोलिसांनी त्यावेळी हे सांगितलं की रहमान डकैत आणि त्याच्या गँगने गोळीबार सुरु केला आणि त्यात रहमान डकैतला गोळ्या लागल्या. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला. कराचीतल्या एका भयंकर गँगस्टरला मी संपवलं आहे असं विधान त्यावेळी चौधरी अस्लमने केलं होतं. दुसरीकडे या एन्काऊंटरच्या विरोधात रहमान डकैतच्या पत्नीने सिंध उच्च न्यायालयात धाव घेतली. तिने हा आरोप केला की रहमान डकैतला आधी पकडण्यात आलं आणि बेकायदेशीररित्या त्याचा एन्काऊंटर घडवून आणला गेला. त्यासाठी तिने पोस्टमॉर्टेम अहवालाचाही दाखला दिला. रहमान डकैतला ज्या गोळ्या लागल्या त्या इतक्या जवळून कशा काय? असा सवालही करण्यात आला. राजकीय हेतूने त्याला संपवण्यात आल्याचा दावाही करण्यात आला. मात्र पाकिस्तानच्या न्यायालयाने याबाबत काहीही निर्णय दिला नाही.

दाऊदने शांतपणे रहमानचा सूड घेतला?

त्यावेळी अशाही चर्चा रंगल्या होत्या की दाऊदने रहमान डकैतचा सूड घेतला. पण त्यासाठी कुठलंही अधिकृत वक्तव्य समोर आलं नव्हतं नंतरही ते आलं नाही. गुन्हेगारी जगतात जेव्हा एखाद्या शत्रुचा बदला घेतला जातो तेव्हा त्याची खूप चर्चा होते, तो जाणीवपूर्वक सगळ्यांना जरब बसेल असा घेतला जातो. पण दाऊदने शांतपणे रहमानला संपवल्याचं बोललं गेलं. पण गुन्हेविश्वाचा जवळून अभ्यास करणारे अभ्यासक हेच मानतात की रहमान डकैत पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला.

धुरंधर २ मध्ये दाखवला गेलेला प्रसंग काय?

हमजा अली मजारी रहमान डकैतला एसएसपी अस्लमच्या मदतीने मारतो हे धुरंधरमध्ये दाखवण्यात आलं आहे. एसएसपी अस्लमने त्याचा एन्काऊंटर रशिद पप्पूच्या सांगण्यावरुन केला असंही दाखवलं गेलं आहे. मात्र चित्रपटात दिग्दर्शकाने त्याचं स्वातंत्र्य घेऊन या गोष्टी विणल्या आहेत. दरम्यान दाऊद आणि रहमान डकैत यांच्यातला वाद हा फक्त दोन गँगस्टर्समधला संघर्ष नव्हता. संपूर्ण अंडरवर्ल्डला हा संदेश मिळाला की गुन्हेगारी साम्राज्याचं सिंहासन कधीही दीर्घकाळ कुणा एकाकडे टिकत नाही.