आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. विशेषकरून भाजपा व तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज(गुरुवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीएमसी प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली. त्यानंतर ममता बॅनर्जींनी देखील कोलकाता येथे एका कार्यक्रमात बोलताना भाजपावर निशाणा साधला.

“ तुम्ही माझ्यावर टीका करू शकता मात्र माझ्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. शेतकऱ्यांना लुटल्यानंतर, मला माझ्या धर्माचे पालन करण्याची परवानगी न दिल्यानंतर, दंगली घडवल्यानंतर, तुम्हाला बंगाल हवा आहे? मी या लोकांसमोर झुकणारी नाही? ” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

यानंतर ममता बॅनर्जींनी भाजपाला आव्हान देत म्हटले की, “चला एक निष्पक्ष खेळ खेळूयात. तुम्ही तुमच्या गटात डावे पक्ष व काँग्रेसला घेऊन लढू शकता व आम्ही एकटं लढतो. एवढच नाही तर मी केवळ गोलकीपर बनेल आणि पाहील की तुम्ही किती गोल करू शकता. ”

तसेच, “ भाजपाच्या नेत्यांना बंगालमध्ये येण्याचा पूर्ण हक्क आहे. मात्र बंगालमध्ये येऊन आम्हाला धमकवतात, मी त्यांना सांगू इच्छिते की मी त्यांना घाबरणारी नाही. मी आतापर्यंत असे सरकार पाहिले नाही जिथं केवळ दोघंच सरकार चालवत आहेत. ” असं देखील यावेळी ममता बॅनर्जींनी म्हटलं.

“भाजपा जर कुठल्याही राज्यात येते तर तिथं दंगली होणं निश्चित आहे. मी बंगालच्या मतदारांना आवाहन करते की, भाजपाला मत देऊन बंगालमध्ये दंगलींना प्रोत्साहन देऊ नका. बंगालमध्ये कधीच जातीय राजकारण झालं नाही, मात्र भाजपाने आता याची सुरूवात केली आहे. भाजपाचे लोकं प्रत्येक धर्माला एकसोबत घेऊन चालत नाहीत, एवढंच नाही तर ते हिंदू धर्माला देखील वाटतात. ” अशी टीका देखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भाजपावर यावेळी केली.