इंडोनेशियाच्या पालू शहराला त्सुनामीच्या लाटांनी तडाखा दिला आहे. सुलावेसी बेटावरील ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामीच्या लाटा उसळल्या आहेत. त्सुनामीच्या लाटांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या लाटा इतक्या प्रचंड वेगाने किनाऱ्यावर धडकल्या कि, लोक आरडाओरडा करत जीव वाचवण्यासाठी पळत सुटले.

महत्वाचं म्हणजे त्सुनामीचा इशारा मागे घेतल्यानंतर या त्सुनामीच्या लाटा उसळल्या. इंडोनेशियाच्या प्रशासनाने भूकंपानंतर तीन मीटर उंचीच्या लाटा उसळतील असे म्हटले होते. नेमकी किती जीवतहानी झाली ते समजू शकलेली नाही.

भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून पालू शहर ८० किलोमीटर अंतरावर असून तीन लाख ५० हजार या शहराची लोकसंख्या आहे. २००५ साली पालू शहराला ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता. त्यावेळी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. सकाळी पालूला ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले. काही इमारती सुद्धा कोसळल्या.

२००४ साली इंडोनेशियातील सुमात्रा येथे आलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर हिंदी महासागरात त्सुनामीच्या लाटा उसळल्या होत्या. यामध्ये १३ देशातील २ लाख २६ हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता. एकटया इंडोनेशियात १ लाख २० हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता.