पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय म्हणजे मूर्खपणा असल्याची टीका ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळावर केलीये. जेठमलांनी यांना पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणावरून मंगळवारी भाजपमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. या कारवाईबद्दल प्रतिक्रिया देताना जेठमलानी यांनी हा मूर्खपणा असल्याचे म्हटले आहे.
काळ्या पैशाविरोधातील माझी भूमिका पक्षातील काही लोकांना झोंबल्यामुळेच आणि या विषयावरून ते अडचणीत येण्याची शक्यता असल्यामुळेच मला पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे जेठमलानी यांनी म्हटले आहे. पक्षातील काही लोकांना काळ्या पैशांबद्दल अजिबात वाच्यता नकोय. गुन्हेगारांकडून तो वसूल करण्यासंदर्भातही त्यांना कोणतीही भूमिका घ्यायची नाही. अशा लोकांचा पर्दाफाश केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मला निलंबित करण्याच्या निर्णय़ामुळे भाजपला लाखो मतांचा फटका बसणार आहे, असेही जेठमलानी यांनी म्हटले आहे. भाजपमध्ये काही उपद्रवी घटक आहेत. त्यांच्यामुळे पक्ष संपुष्टात येण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.