Malyalam Director Kaja Hussain Arrested for Theft cases: चित्रपटसृष्टीतील अपयश आणि आर्थिक विवंचनेमुळे एका मल्याळम चित्रपट दिग्दर्शकाने चक्क रेल्वे प्रवाशांचे लॅपटॉप आणि महागडे मोबाईल फोन चोरण्याचा मार्ग पत्करल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी केरळमधील शोरनूर रेल्वे पोलिसांनी कारवाई करत चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता काजा हुसेन (वय ४६) याला अटक केली आहे.
काजा हुसेन याने २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कल्लांनमारुडे वीडू’ या मल्याळम चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे अपयशी ठरल्याने हुसेनचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या नुकसानातून बाहेर पडण्यासाठी आणि पैशांची चणचण भागवण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग निवडल्याचे प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी जेरबंद
‘मंगळुरू सेंट्रल इंटरसिटी सुपरफास्ट एक्स्प्रेस’मधून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाचा ८० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरीला गेला होता. याप्रकरणी शोरनूर रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. रेल्वे स्थानक परिसरातील आणि गाड्यांमधील सीसीटीव्ही चित्रीकरणाची पडताळणी केली असता हुसेनचा संशयास्पद वावर समोर आला. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
काजा हुसेनविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (वाहतुकीची साधने, घरे किंवा धार्मिक स्थळांवर केलेली चोरी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओळख लपवण्यासाठी लूक बदलला; चोरीची पद्धत समोर
हुसेन कामाच्या निमित्ताने वारंवार रेल्वेने प्रवास करत असे. प्रवासादरम्यान सहप्रवाशांचे लक्ष विचलित झाल्याची संधी साधून तो त्यांचे महागडे लॅपटॉप आणि मोबाईल लंपास करायचा. पकडले जाऊ नये म्हणून त्याने आपली दाढी काढून चेहरापट्टीमध्ये बदलही केला होता. चोरी केलेले साहित्य तो आपण सेकंड हँड वस्तूंचे विक्रेते असल्याचे भासवून स्थानिक दुकानांमध्ये विकायचा, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
पोलिसांनी त्याच्याकडून पाच लॅपटॉप आणि एक मोबाईल फोन जप्त केला आहे. शोरनूर रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या तीन गुन्ह्यांसह कोझिकोड परिसरातील रेल्वे चोरीच्या प्रकरणांमध्येही त्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
यापूर्वी फसवणुकीच्या गुन्ह्यातही अटक
काजा हुसेन याच्यावर यापूर्वीही आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. जुलै २०२४ मध्ये पालक्काड येथील एका मांस व्यावसायिकाला चित्रपटात महत्त्वाची भूमिका आणि नफ्यात वाटा देण्याचे आमिष दाखवून ६७.५ लाख रुपयांना गंडवल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती. वारंवार पैसे परत मागूनही ते न मिळाल्याने संबंधित व्यावसायिकाने पोलिसांत धाव घेतली होती. त्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणापाठोपाठ आता रेल्वे चोरीच्या गुन्ह्यांत त्याला गजाआड करण्यात आले आहे.
