काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हल्द्वानी येथील दौऱ्यानंतर तिथे शुद्धीकरण करण्यात आलं. मी दलित असल्याने भाजपाने हे केलं असा आरोप मल्लिकार्जुन खरगेंनी केला होता. मात्र भाजपाने हे आरोप फेटाळून लावले. त्यानंतर राहुल गांधींनीही यावरुन आरोप केले होते. दरम्यान या सगळ्या घडामोडी ताज्या असतानच आता राहुल गांधींना सद्बुधी मिळावी म्हणून बुद्धी शुद्धी यज्ञ करण्यात आला आहे. देहरादून येथील एका देवळात हा यज्ञ आयोजित करण्यात आला होता. राहुल गांधी यांची चित्रं समोर ठेवून हा यज्ञ करण्यात आला. आता यावरुन पुन्हा एकदा राजकारण रंगण्याची चिन्हं आहेत. राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी मल्लिकार्जुन खरगेंच्या दौऱ्यानंतर जे शुद्धीकरण करण्यात आलं त्याविरोधात १९ जिल्ह्यांमध्ये तक्रारी नोंदवल्या आहेत. यानंतर आता राहुल गांधींचे फोटो समोर ठेवत देहरादूनमध्ये बुद्धी शुद्धी यज्ञ करण्यात आला आहे.
बुद्धी शुद्धी यज्ञाचं प्रकरण नेमकं काय?
भाजपा एसी मोर्चाचे प्रवक्ते जयपाल वाल्मिकी यांनी सांगितलं की २०१४ पासून सातत्याने भाजपाचं सरकार केंद्रात स्थापन होतं आहे. पण राहुल गांधी हे तेव्हापासूनच सातत्याने केंद्र सरकारच्या विरोधात बोलत आहेत. राहुल गांधी गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळेच बुद्धी शुद्धीसाठी आम्ही यज्ञ आणि हवन केलं आहे. जयपाल वाल्मिकी म्हणाले, या माध्यमातून आम्ही ही प्रार्थना केली आहे की राहुल गांधींना सद्बुद्धी मिळो आणि त्यांनी सकारात्मक राजकारणाच्या वाटेवर जावो. अशी प्रार्थना आम्ही केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
राहुल गांधी फक्त मोदींच्या विरोधात गरळ ओकत आहेत-जयपाल वाल्मिकी
जयपाल वाल्मिकी पुढे म्हणाले की, हल्द्वानी या ठिकाणी मंचावर शुद्धीकरण करण्यात आलं कारण त्या ठिकाणी घाण होती. त्यामुळेच तिथे रामलीला मैदान धार्मिक संघटनेने शुद्धीकरण केलं. २०१४ पासून देशाच्या जनतेने राहुल गांधींना नाकारलं आहे. जेव्हापासून नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाले आहेत राहुल गांधी विविध विषयांवर फक्त गरळ ओकण्याचं काम करत आहेत. जंतर-मंतर या ठिकाणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राहुल गांधींनी जी भूमिका घेतली आणि त्यांच्या लोकांना पाठवून आंदोलनाला ज्या प्रमाणे हिंसक आणि उग्र स्वरुप दिलं त्यामुळे देशातलं वातावरण बिघडण्यास हातभार लागला. आम्ही त्याच अनुषंगाने राहुल गांधींच्या बुद्धी शुद्धीसाठी यज्ञ केला आहे. आता यावरुन राजकारण आणखी रंगणार यात काहीही शंका नाही.
