Iran Bab el-Mandeb Strait Threat Triggers Global Energy Crisis: अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यात लष्करी संघर्ष सुरू झाल्यानंतर इराणने तेल वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेली होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी केली. त्यानंतर संपूर्ण जगावर ऊर्जा संकट ओढवले. शत्रू जहाजांसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्यावर बंधने घालण्यात आली आहेत. आता इराणच्या संसदेच्या अध्यक्षांनी सुचवले आहे की, तेहरान जगातील आणखी एक अत्यंत महत्त्वाची बाब एल मंडेब सामुद्रधुनी लक्ष्य करू शकतात.

इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी शुक्रवारी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये हा इशारा दिला आहे. लाल समुद्रात एडनजवळ बाब एल मंडेब सामुद्रधुनीचा उल्लेख त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. गालिबाफ यांनी लिहिले, “जागतिक तेल, एलएनजी, गहू, तांदूळ आणि खतांच्या वाहतुकीपैकी किती वाटा बाब एल मंडेब सामुद्रधुनीतून जातो?”

हा प्रश्न विचारून गालिबाफ पुढे म्हणाले की, या सामुद्रधुनीतून कोणते देश आणि कंपन्यांना सर्वाधिक पुरवठा होतो? किती देश या मार्गावर अवलंबून आहेत, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपला आर्थिक प्रभाव वाढविण्यासाठी इराण आणखी मार्ग शोधत असल्याचे संकेत यातून मिळाले आहेत.

बाब एल मंडेब सामुद्रधुनी कुठे आहे?

लाल समुद्र आणि एडनचे आखात यांना जोडणारा चिंचोळा समुद्रमार्ग म्हणजेच बाब एल मंडेब सामुद्रधुनी. अरबी भाषेत बाब एल मंडेबचा अर्थ अश्रूंचे द्वार! या मार्गाची लांबी १०० किलोमीटर असून किमान रुंदी ३० किलोमीटर आहे. सौदी अरेबियाच्या यांबू बंदरातून या मार्गातून मोठ्या प्रमाणात खनिज तेल मार्गस्थ होते. या सामुद्रधुनीतून लाल समुद्र आणि सुएझ कालव्याच्या माध्यमातून भूमध्य समुद्र गाठता येतो. त्यामुळे आशिया आणि युरोप यांना जोडणारा अत्यंत मोक्याचा व्यापारी मार्ग या सामुद्रधुनीतून जातो. यासाठी युरोपहून येताना आफ्रिकेला वळसा घालून आशियाकडे येण्याची गरज भासत नाही. येथून तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरू असते.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, रणांगणावर मोठा संघर्ष होत असतानाच इराणकडून सागरी आघाडीवरील ही सामरिक चाल खेळण्यात येत आहे. इराण आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या सैन्याने आता वेव्ह ९३ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत इस्रायलच्या महत्त्वाच्या लष्करी तळांवर हल्ले केले जात आहेत, असे सरकारी वृत्तवाहिनी प्रेस टीव्हीने सांगितले. अलीकडील संघर्षाला इराणकडून दिलेले हे थेट प्रत्युत्तर असल्यामुळे यामुळे प्रादेशिक संघर्षात लक्षणीय वाढ झाली आहे.

प्रेस टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, इस्लामिक रिव्होल्यूशन गार्ड्स कॉर्प्सच्या (आयआरजीसी) एका निवेदनानुसार, ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ४ चा नवीन टप्पा शुक्रवारी दुपारी पार पाडण्यात आला. या मोहिमेत उत्तरेकडील मोक्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. मिळालेल्या वृत्तानुसार, इराणच्या या तीव्र हल्ल्यात पश्चिम गॅलिली, हायफा, काफर काना आणि क्रायोट येथील इस्रायली सैन्याच्या तळांवर अचूक हल्ला करण्यात आला.