जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्या्ंकडून कश्मिरी पंडितांच्या होणाऱ्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख मनोज पांडे, जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग आणि गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’चे प्रमुख समंत गोएल उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून कश्मिरी पंडितांच्या हत्यांचे प्रमाण वाढत चाललं आहे. १ मेपासून आतापर्यंत आठ लोकांची हत्या करण्यात आल्या आहेत.

काश्मीरच्या कुलगाममध्ये बँकेत घुसून विजय कुमार या व्यवस्थापकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात विजय कुमार यांचा मृत्यू झाला. काही दिवासांपूर्वीच काश्मिरी पंडित शिक्षिका रजनी बाला यांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तसंच एका १७ वर्षीय दिलखुश कुमार या कामगारालाही दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केलं.

काश्मीरमध्ये बँकेत घुसून मॅनेजरची गोळ्या घालून हत्या; गेल्या ४८ तासांत दोन हत्या!

विजय कुमार हे मुळचे राजस्थानचे रहिवासी होते. कुलगाममधील अरे मोहनपोरा गावात एल्लाकी देहाती बँकेच्या (ईडीबी) शाखेत ते व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. तर मंगळवारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी शिक्षिका रजनी बाला यांची गोळ्या घालून हत्या केली होती. बाला या काश्मिरी पंडित होत्या. तसेच बडगाममध्ये तहसील कार्यालयात घसून सरकारी कर्मचारी राहुल भट्ट यांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली होती.

काश्मीरमधील हत्यासत्रावर संजय राऊत संतापले; भाजपावर जोरदार टीका; म्हणाले “इतर पक्षाच्या राजवटीत झालं असतं तर…”

बुधवारी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सर्व हिंदू सरकारी अधिकाऱ्यांची जिल्हा मुख्यालयात बदली करण्याचा निर्णय घेतला. प्रशासन आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही बदली करण्यात आली.

दुर्गम भागात सेवा देणार्‍या हिंदू सरकारी कर्मचार्‍यांना काश्मीर खोर्‍यातील जिल्हा मुख्यालयात स्थानांतरित केलं जाणार आहे. तर जम्मू-काश्मीरमधील सर्व हिंदू सरकारी कर्मचार्‍यांना सरकार सुरक्षा देणार असून राहण्याची व्यवस्था करणार आहे.

कर्मचारीदेखील या हल्ल्यांविरोधात आंदोलन करत आहेत. जम्मू काश्मीरमधून बदली व्हावी अशी मागणी करत आहेत. गेल्या महिन्यात काश्मीर खोऱ्यातील ३५० सरकारी कर्मचाऱ्यांनी (सर्व काश्मिरी पंडित) सहकारी राहुल भट्टच्या हत्येनंतर आपले राजीनामे मनोज सिन्हा यांच्याकडे सादर केले होते. आपल्याला आता सुरक्षित वाटत नसल्याचं सर्व काश्मिरी पंडित सांगत होते.