US Intelligence Alert following Ayatollah Ali Khamenei death: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला ११ दिवस होत आहेत. इराणवर अमेरिका आणि इस्रायलने जोरदार हल्ला केला असून इराणही त्यांना प्रत्युत्तर देत आहे. युद्धात पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामने यांचा मृत्यू झाला. त्यानंतरही हे युद्ध थांबलेले नाही. याउलट खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणकडून पाठविण्यात आलेला एक संदेश अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागला आहे. या एन्क्रिप्टेड संदेशात इराणने विदेशातील स्लीपर सेल सक्रिय केल्याचे सांगितले जात आहे.

एबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या हाती हा गुप्त संदेश लागला. खामेनी यांचा २८ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाल्यानंतर लगेचच हा संदेश पाठविण्यात आला होता. प्राथमिक सिग्नल विश्लेषणाचा हवाल्यानुसार हा संदेश इराणमधून पाठविण्यात आला होता, असे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले आहे. या संदेशाला आणखी काही देशांमध्ये प्रसारित केल्याचेही समोर आले आहे.

इराणमधून पाठिवण्यात आलेला कथित संदेश एन्क्रिप्टेड होता आणि तो केवळ संदेश प्राप्त करणाऱ्यांसाठी होता. संदेश पाठविण्याची ही पद्धत गुप्तचर संस्था किंवा अतिरेकी संघटना वापरत असतात. संदेश पाठविल्यानंतर त्याचे डिजिटल पुरावे राहू नयेत, ही खबरदारी अशा प्रकारच्या संदेशातून घेतली जाते. हे संदेश मोबाइल नेटवर्क किंवा इंटरनेटवर आधारीत नसतात.

स्लीपर सेलसाठी संदेश असल्याचा संशय

विदेशात असलेल्या स्लीपर सेलला सक्रिय करण्यासाठी किंवा त्यांना निर्देश देण्यासाठी हा संदेश पाठवला गेला असावा असा संशय अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला आहे. तथापि, या संदेशातील मजकूर अद्याप समोर आलेला नाही. तसेच संदेशातून कोणताही संभाव्य धोका समोर आलेला नाही. मात्र नव्या रेडिओ स्थानकाचा शोध लागल्यामुळे सतर्कता वाढविण्यात आली आहे.

इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आणखी तीव्र होत असताना हा संदेश समोर आल्यामुळे खळबळ उडली आहे. खामेनी यांच्या मृत्यूनंतरही इराणमध्ये नेतृत्व बदल झाला. मात्र तरीही इराणच्या कडव्या प्रतिकाराची धार कमी झालेली नाही. इस्रायली सेनेने सोमवारी मध्य इराणमध्ये अनेक हल्ले केले. ज्यात बैरूतमधील हेजबोलाच्या ठिकाणांनाही लक्ष्य केल्याचा समावेश आहे.

तर दुसरीकडे इराणनेही इस्रायल आणि मध्य पूर्वेतील अमेरिकन सैन्य तळांवर हल्ले सुरू ठेवले आहेत.