Andhra Woman Kills Husband: ‘पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या’, अशा प्रकारचे गुन्हे गेल्या वर्षभरात अनेक ठिकाणी घडले आहेत. उत्तर प्रदेशमधील मेरठच्या मुस्कान रस्तोगीचे निळ्या ड्रमचा गुन्हा असेल किंवा सोमन रघुवंशीचा हनिमून मर्डर असेल, अशा अनेक गुन्ह्यांच्या हादरवणाऱ्या कथा समोर आल्या. आता यात आणखी भर पडली आहे ती आंध्र प्रदेशची. गुंटूर जिल्ह्यातील चिलुवुरू गावात एका महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. हे धक्कादायक कृत्य केल्यानंतर ती पतीच्या मृतदेहासमोरच बसून पॉर्न पाहत असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लक्ष्मी माधुरीने प्रियकराबरोबर पतीच्या हत्येचा कट रचला. पतीचे नाव लोकम शिव नागराजू असून तो कांदा व्यापारी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येच्या रात्री माधुरीने पतीसाठी बिर्याणीचा बेत आखला होता. यात नशेचा पदार्थ मिसळल्यामुळे नागराजूची शुद्ध हरपली.

अशी आखली हत्येची योजना

पती बेशूद्ध होताच माधुरीने कटाची पुढची योजना अमलात आणली. रात्री ११.३० वाजता माधुरीचा कथित प्रियकर गोपी त्यांच्या घरी आला. पोलिसांनी सांगितल्यानुसार, नागराजूच्या छातीवर बसून गोपीने त्याला पकडून ठेवले होते. तेव्हा माधुरीने उशीच्या सहाय्याने पतीचा श्वास कोंडला. यामुळे काही वेळातच नागराजूचा मृत्यू झाला.

नागराजू मरण पावल्याची खात्री झाल्यानंतर गोपी तिथून निघून गेला. माधुरी आणि नागराजूचे पार्थिव त्याच घरात होते. यानंतर जे काही झाले, ते ऐकून तपासकर्ते पोलीसही हादरून गेले. पतीच्या मृत्यूनंतर पत्नी माधुरी शांतपणे तिथेच बसली. वेळ घालविण्यासाठी ती मोबाइलवर पॉर्न व्हिडीओ पाहत होती.

पहाटे केला कांगावा

पहाटे ४ वाजता तिने शेजारपाजारच्या लोकांना गोळा केले आणि नागराजूचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र तिने सांगितलेल्या कथानकांवर लोकांचा विश्वास बसेना. माधुरी आणि नागराजू यांच्यातील सततचे भांडण आणि तिच्या बाहेरच्या संबंधांची शेजाऱ्यांना कल्पना होती. यामुळे त्यांना माधुरीवर संशय आला.

पतीच्या मित्रांना आला संशय

नागराजूच्या मित्रांनी जेव्हा त्याचे शव पाहिले, तेव्हा त्यांना कानाजवळ रक्ताचे डाग आणि शरीरावर जखमा दिसल्या. यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे नागराजूच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. ज्यामध्ये श्वास कोंडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. तसेच त्याच्या छातीच्या हाडांमध्ये फ्रॅक्चर असल्याचेही समोर आले.

पोलिसांनी अहवालानंतर माधुरीची कसून चौकशी केली. त्यानंतर तिने आपला गुन्हा कबूल केला. पतीची हत्या केल्यानंतर रात्रभर आपण पॉर्न व्हिडीओ पाहत होतो, असा खुलासाही तिने केला. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणातील इतर पैलूंचा तपास सुरू केला आहे.