मलेशिया पाठोपाठ आता टर्की मोदी सरकारच्या रडारवर आहे. टर्की बरोबर व्यापारी संबंध कमी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप केल्यामुळे मोदी सरकार टर्कीवर नाराज आहे. मलेशियाच्या बाबतीत पाम तेलाची आयात कमी करण्याचा ठोस निर्णय घेण्यात आला, पण टर्की बद्दल असा कोणताही निर्णय झालेला नाही.

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यासह वेगवेगळया विषयांवर टर्की पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला आहे. टर्कीकडून तेल आणि स्टील आयात कमी करण्याचा सरकार दरबारी विचार सुरु आहे. टर्कीकडून होणाऱ्या आयातीवर निर्बंध आणण्याचा सल्ला सरकारला देण्यात आला आहे असे सूत्रांनी सांगितले.

२०१९-२० मध्ये भारत आणि टर्कीमध्ये ७.८ अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला. टर्कीकडून तेलाची मोठया प्रमाणावर खरेदी करण्यात आली. भारत मलेशियाकडून पाम तेलाची मोठया प्रमाणावर आयात करायचा. मलेशियाला आर्थिक फटका बसावा या हेतूने भारताने पाम तेलाच्या आयीतवर निर्बंध आणले. २०१९-२० मध्ये भारताने मलेशियाबरोबर १७ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्तचा व्यवहार केला. यात ६.४ अब्ज डॉलर्स पर्यंत निर्यात केली तर, १०.८ अब्ज डॉलर्सपर्यंत वस्तुंची आयात केली.