तिरुवनंतपुरम : राहुल गांधी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांचे केरळमधील काँग्रेस नेत्यांशी असलेले ताणलेले संबंध निवळले असून थरुर आता केरळमधील आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफचे स्टार प्रचारक असतील. याबाबतची माहिती शुक्रवारी केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

थरुर यांनी गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी ‘सर्व ठीक आहे, काँग्रेसमध्ये आम्ही एकजूट आहोत’, असे वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य पक्षाशी समेट असल्याचे मानले जात आहे.

थरुर यांचे जागतिक व्यक्तिमत्त्व आणि प्रसिद्ध लेखक असे वर्णन करतानाच सतीशन यांनी थरुर काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याने ते निवडणूक काळात पुढील दोन महिने राज्यात अधिक सक्रिय असतील असे सांगितले. काँग्रेस पक्षाने थरुर यांच्यावर सर्व १४० विधानसभा मतदारसंघांत प्रचाराची जबाबदारी सोपविणार असल्याचेही सतीशन म्हणाले.

गेल्या आठवड्यात थरुर यांनी केरळ निवडणूक रणनीती बैठकीला उपस्थित राहणे टाळले होते. येथील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी त्यांना दुर्लक्षित केल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता असे सूत्रांनी सांगितले. कोची येथील सभेत राहुल गांधी यांनी व्यासपीठावरील सर्व वरिष्ठ नेत्यांची नावे घेतली तथापि, चार वेळा खासदार राहिलेले आणि कार्यकारिणीचे सदस्य असलेल्या थरुर यांचा उल्लेखही केला नव्हता.

राहुल गांधी जातीयवादाविरोधात ‘मजबूत आवाज’ ‘राहुल गांधी एक प्रामाणिक व्यक्ती असून ते देशातील जातीयवादसारख्या विविध मुद्द्यांवर मजबूत आवाज आहेत’ अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केले. राहुल गांधी यांच्याविरुद्ध कोणत्याही नकारात्मक टिप्पणींशी सहमत नसल्याचे सांगतानाच राहुल गांधी प्रामाणिक नेते असल्याचे थरुर म्हणाले.