Infiltration attempt by militants in Baramulla : पहलगाम हल्ल्यानंतर २४ तासांच्या आत दहशतवाद्यांनी आणखी एका हल्ल्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे. बारामुल्लाजवळच्या सीमेवरून दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवान त्यांना रोखण्यात यशस्वी ठरले. जवानांच्या एका तुकडीने या दहशतवाद्यांना घेरलं असून जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक चालू आहे.
दरम्यान, भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवादी मागे फिरले. मात्र, दोन ते तीन दहशतवादी माघारी जाण्यात अपयशी ठरले असून जवानांनी सीमेजवळ त्यांना घेरल्याची माहिती समोर आली आहे.
लष्करी जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक
भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने या चकमकीची माहिती देताना सांगितलं की २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी बारामुल्ला येथील उरीजवळची सीमी ओलांडून तीन ते चार दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. सीमेवरील तैनात भारतीय लष्कराच्या पथकाला या घुसखोरीची चाहूल लागताच त्यांनी दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांनी देखील प्रत्यु्त्तरात गोळीबार केला. बराच वेळ दहशतवादी व लष्करी जवानांमध्ये चकमक झाली. त्यानंतर दहशतवादी मागे फिरू लागले. मात्र, जवानांनी त्यांना घेरलं. हे दहशतवादी सीमेजवळच्या जगलात लपून बसले आहेत. त्यामुळे लष्कराने त्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या सीमेसह संपूर्ण प्रदेशात मोठ्या संख्येने लष्करी तुकड्या तैनात करण्यात आले आहेत. अशातच दहशतवाद्यांनी भारतात घुसण्याचा प्रयत्न केला जो भारतीय जवानांनी हाणून पाडला .
दहशतवाद्यांनी काश्मीरमधील पहलगामजवळ असलेल्या ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी (२२ एप्रिल) पर्यटकांवर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्लात २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा रहिवाशांचा समावेश आहे. यात डोंबिवलीचे तिघे, पुण्यातील दोन व पनवेलमधील एका रहिवाशाचा समावेश आहे.
दरम्यान, जवानांनी घुसखोरी करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्याचं वृत्त समोर आलं आहे.