पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दसऱ्याच्या दिवशी लखनऊमध्ये येऊन रावण दहन कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमात त्यांनी रावणासारख्या समाजातील वाईट प्रथा आणि दहशतवाद संपवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री मोहम्मद अब्बास यांनी मोदींच्या या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर टीका केली. ज्यांचे राजकारणच रावणाच्या वाईट नीतीसारखे आहे. ते उत्तर प्रदेशमध्ये येऊन रावणाच्या खात्म्यासंबंधी कसे बोलू शकतात असा सवाल केला आहे.
पंतप्रधान मोदींचे नाव न घेता अब्बास म्हणाले, रावणाकडे सोन्याची लंका होती. परंतु त्यावेळी सामान्य माणूस सुखी नव्हता. आजही अंबानी अदानी यांच्यासारख्या उद्योजकांनाचा लाभ होतो. या उलट गरीब लोकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ज्या राज्यात गरीबांचे भले होते. तेच खरे राम राज्य आहे अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
ज्यावेळी त्यांना तुम्ही मोदींची तुलना रावणाशी करत आहात का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, जर आमच्या मुख्यमंत्र्यांची रावणाशी तुलना केली जात असेल तर मोदींची काय रामाशी तुलना केली जावे असे तुम्हाला वाटते असा प्रतिप्रश्न त्यांनी माध्यमांना विचारला.
दरम्यान मंगळवारी रात्री दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रामदेव बाबा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. विद्यमान सरकारच्या निराशजनक कामगिरीचा व विद्यार्थी विरोधी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही मोदींच्या पुतळ्याचे दहन केल्याचा दावा एनएसयुआयचा सभासद मसूदने केला आहे.
एनएसयूआयच्या काही कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याविरोधात घोषणा देत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.