नवी दिल्ली : त्रिपुरामध्ये तृणमूल काँग्रेसच्या युवा शाखेच्या प्रमुख शायनी घोष यांना हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर तृणमूलने सोमवारी दिल्लीत भलताच आक्रमक पवित्रा घेऊन केंद्र सरकारवर दबाव वाढवला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीत येणार असल्यामुळेही तृणमूलच्या खासदारांनी दिवसभर वातावरण निर्मिती केल्याचे दिसत होते.

त्रिपुरामध्ये मुख्यमंत्री बिप्लब देब यांची जाहीरसभा सुरू असताना तिथे शायनी घोष आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांनी दगडफेक केल्याचा आरोप राज्य सरकारने केला. घोष यांना तातडीने अटक केल्यामुळे या वादाला भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशा संघर्षांचे रूप आले. त्रिपुरामधील हिंसाचाराला तृणमूल काँग्रेस जबाबदार नसल्याचा युक्तिवाद करत ही लढाई थेट दिल्लीत नेण्याचा निर्णय घेण्यात आला व तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना तातडीने दिल्लीत रवाना होण्याचा आदेश तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला. या आदेशानुसार, सोमवारी सकाळी लोकसभा व राज्यसभेतील बहुतांश खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयासमोर म्हणजे नॉर्थ ब्लॉकसमोर जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी केली. तृणमूलच्या शिष्टमंडळाला शहांनी भेटण्यासाठी वेळ दिली नाही, त्यामुळे तृणमूलचे खासदार आणखी संतप्त झाले. कोणत्याही परिस्थिती शहांची भेट मिळालीच पाहिजे असा पक्ष खासदारांनी आग्रह धरल्यानंतर अखेर शहांनी सोमवारी संध्याकाळी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांच्या शिष्टमंडळाला कृष्ण मेनन मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी भेट दिली.

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्याशी माझे बोलणे झाले असून राज्य सरकारकडून संबंधित घटनेबाबत अहवाल मागवला असल्याचे शहा यांनी स्पष्ट केल्याचे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पत्रकारांना सांगितले. त्रिपुरात आणखी हिंसा होऊ नये व कोणाविरोधात बनावट गुन्हे दाखल केले जाऊ नयेत ही तृणमूल काँग्रेसची प्रमुख मागणी आहे. त्रिपुरामध्ये हिंसक घटना होणार नाहीत, असे आश्वासन शहा यांनी दिल्याची माहिती सौगत राय यांनी दिली.

पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा हा दुसरा दिल्ली दौरा असून त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या वाढवलेल्या कार्यक्षेत्राला तृणमूल काँग्रेसने आक्षेप घेतला असून हा केंद्र सरकार आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील नव्या वादाचे कारण ठरले आहे.

या भेटीत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी वा अन्य राजकीय पक्षाच्या नेत्यांशी भेट व चर्चा होण्याबाबत अजून स्पष्टता नसली तरी ममता बॅनर्जी यांनी पुन्हा राजकीय दबाव वाढवला असल्याचे मानले जात आहे.

प्रचारासाठी अभिषेक बॅनर्जी त्रिपुरात

आगरतळा : त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या प्रचारासाठी तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी सोमवारी येथे पोहचले. आदल्याच दिवशी, मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांच्या एका सभेत कथितरीत्या अडथळा आणल्याबद्दल तृणमूलच्या युवक नेत्या सयोनी घोष यांना अटक करण्यात आली होती. सोमवारी बॅनर्जी यांच्या आगमनाच्या काही वेळ आधी आगरतळा विमानतळावर एक संशयास्पद बॅग आढळल्यामुळे तीत बॉम्ब असल्याची भीती पसरली. ही बॅग नंतर सुरक्षित स्थळी हलवण्यात आली. २५ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या निवडणुका लढवणाऱ्या पक्ष उमेदवारांसाठी बॅनर्जी हे प्रचारसभा घेणार आहेत.

रविवारी येथील एका पोलीस ठाण्यात तृणमूलचे समर्थक व कार्यकर्ते यांच्यावर झालेल्या ‘हल्ल्याचा’ निषेध करताना, राज्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती पूर्णपणे ढासळली असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला. पूर्वी अभिनेत्या असलेल्या व आता तृणमूलच्या नेत्या झालेल्या सयोनी घोष यांना लोकांमध्ये वैर पसरवल्याच्या आणि खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपांखाली रविवारी अटक करण्यात आली होती. त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत अडथळा आणण्यासाठी त्यांनी कथितरीत्या ‘खेला होबे’ची घोषणा दिली होती.