बिहारच्या राजकारणातला वादळी दिवस! राजीनाम्यानंतर बुधवारी पुन्हा नितीश कुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीसोबतची युती तोडली आहे.

बिहारच्या राजकारणातला वादळी दिवस! राजीनाम्यानंतर बुधवारी पुन्हा नितीश कुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
संग्रहित फोटो

बिहारच्या राजकारणात आजचा दिवस ‘वादळी दिवस’ ठरला आहे. आज दिवसभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीसोबतची युती तोडली आहे. त्यानंतर नितीश कुमारांनी राज्यपालांची भेट घेत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. एवढेच नव्हे तर भाजपा आणि जेडीयूची युती तुटल्यानंतर त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षासोबत युती केली आहे. त्याचबरोबर नवीन सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून वेळही घेतला आहे. या सर्व घडामोडी बिहारच्या राजकारणात एकाच दिवशी घडल्या आहेत.

भाजपा-जेडीयूचं सरकार कोसळल्यानंतर, उद्या (बुधवारी) दुपारी दोन वाजता नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आठव्यांदा शपथ घेणार आहेत. तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. बिहारच्या राजभवनात उद्या हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

दोन वर्षांपूर्वीच भाजपा आणि जेडीयू पक्षाने युती केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि भाजपामध्ये सुरु असलेला वाद शिगेला पोहचला होता. अखेर नितीश कुमारांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत बिहारमध्ये राजकीय भूकंप घडवून आणला आहे.

हेही वाचा- बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमारांनी भाजपासोबतची युती तोडली

नीति आयोगाच्या बैठकीला नितीश कुमार अनुपस्थित
नुकत्याच पार पडलेल्या नीति आयोगाच्या बैठकीला नितीश कुमार अनुपस्थित होते. मागील एक महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीतही नितीश कुमार दुसऱ्यांदा गैरहजर राहिले होते. त्यामुळे नितीश कुमार आणि केंद्र सरकारमध्ये मतभेद असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यामुळे कोणत्याही क्षणी बिहारमधील सत्ताधारी भाजपा – जदयूमधील युती तुटेल, याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते. अखेर आज नितीश कुमार यांनी भाजपासोबतची युती तोडल्याची घोषणा केली. तसेच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देखील दिला आहे. उद्या ते पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After resignation jdu leader nitish kumar will again take oath as chief minister on wednesday bihar politics rmm

Next Story
बिहारमध्ये पुन्हा महागठबंधन! भाजपाशी काडीमोड केल्यानंतर नितीश कुमार यांनी केला सत्तास्थापनेचा दावा
फोटो गॅलरी