PM Modi Announces Solar Scheme : अयोध्यानगरीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर झालेल्या सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी आपले विचार प्रकट केले. “प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर तर बनले तर पुढे काय? असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला आणि पुढील हजार वर्ष भारतावर परिणाम करेल, असे कार्य आता करायचे आहे, असे सूतोवाच त्यांनी केले. त्यानंतर पंतप्रधान पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. आज त्यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर या योजनेची माहिती दिली. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, “सूर्यवंशी भगवान श्री रामाच्या आशीर्वादामुळे जगातील त्यांच्या भक्तांना नेहमीच उर्जा मिळते. आज अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभप्रसंगी माझा संकल्प आणखी दृढ झाला आहे की, भारतातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर स्वतःची सौरऊर्जा यंत्रणा असावी.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “अयोध्येतून परतल्यानंतर मी पहिला निर्णय घेतला की, आमचे सरकार एक कोटी नागरिकांच्या घरावर रूफटॉप सोलार पॅनल लावण्यासाठी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची सुरूवात करत आहे. यामुळे गरीब आणि मध्यम वर्गाला विज बिल कमी येईलच. त्याशिवाय ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होईल.”