पुस्तकातून जिद्दीची कहाणी उलगडली
बिहारमध्ये पुन्हा मुख्यमंत्री होत असलेले नितीशकुमार १९७७ व १९८० मध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवाने निराश होते. ते लागोपाठचे दोन पराभव जिव्हारी लागल्याने उद्योजक बनण्याचा विचार करीत होते. किंबहुना अभियांत्रिकीच्या पदवीवर एखादी नोकरी मिळवण्याचा विचारही त्यांच्या मनात होता. पण मित्र व पत्नीने दिलेली साथ व त्यांची स्वत:ची जिद्द यामुळे नंतर सगळा घटनाक्रमच वेगळा झाला, असे पत्रकार संतोष सिंह यांनी लिहिलेल्या पुस्तकात म्हटले आहे. १९७७ व १९८० मध्ये काँग्रेसचे भोला सिंह यांनी कुमार यांचा हरनौत मतदारसंघातून पराभव केला होता. तेव्हा त्यांनी नैराश्यातून मुन्ना सरकार या मित्राला असे सांगितले होते की, ऐसे कैसे होगा, लगता है कोई बिझनेस करना होगा.
नितीशजींनी त्यावेळी शिक्षिका असलेली पत्नी मंजू यांना विचारले की, एकदा तरी तू मला पुन्हा राजकारणात संधी दे, त्यावेळी १९८५च्या निवडणुका जवळ होत्या. ‘रुल्ड ऑर मिसरुल्ड’ या पुस्तकात नितीशजींमधील हे अपयशाचे क्षण नोंदवले गेले आहेत.
भोला सिंह हे प्रतिस्पर्धी होते पण तरीही कुमार यांनी १९८५ मध्ये त्यांच्या विरोधात झुंज देण्याचे ठरवले. त्यावेळी मित्रमंडळींनी नितीशकुमार यांच्या प्रचारासाठी देणग्या दिल्या. नितीश या राजकीय लढाईत उतरले तेव्हा त्यांच्या विजयासाठी सर्वानी कंबर कसली होती. त्यांच्या पत्नी मंजू यांनी त्यांना साठवलेल्या पैशातील २० हजार रुपये दिले. शेवटी नितीशकुमार यांनी १९८५ची निवडणूक जिंकली व ते विधानसभेत पोहोचले, नितीशकुमार यांची पाश्र्वभूमी पाहिल्यानंतर त्यांनी तेव्हा राजकारण सोडले असते तर ती चूकच ठरली असती असे म्हणावे लागते. त्यांची जिद्द व पत्नी तसेच मित्रांची साथ यामुळे त्यांनी अखेर राजकारणात पाय रोवले. ३३९ पानांच्या या पुस्तकात नितीशकुमार, लालूप्रसाद व सुशीलकुमार मोदी या १९७४ मध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून घडलेल्या नेत्यांचेही किस्से व त्यांची यशाची कहाणी वर्णन केली आहे.
