देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आज (रविवार) राजधानी दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनुपस्थितीत झालेल्या या बैठकीस विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील सहभाग होता. तसेच, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांची देखील बैठकीला उपस्थिती होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या दरम्यान अमित शाह यांनी नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली आणि सीमा भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. विज्ञान भवन, दिल्ली येथे बैठक बोलावण्यात आली होती.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव या बैठकीला उपस्थित होते. मात्र, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. या बैठकीला दोन्ही राज्यांनी आपले प्रतिनिधी पाठवले होते. तर, या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह व अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत जेवण देखील केले. यावेळी देखील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.

ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र सदनात पत्रकारपरिषद घेतील, असं वाटत होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांनी तसे करता ते थेट मुंबईला जाण्यासाठी विमानतळाकडे रवाना झआले. यामुळे बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप तरी बाहेर आलेलं नाही.

दरम्यान, सुरक्षा परिस्थितीची माहिती घेण्याबरोबरच गृहमंत्री अमित शहा या माओवादग्रस्त भागातील रस्ते, पूल, शाळा आणि आरोग्य केंद्रांचे बांधकाम यासारख्या विकास कामांचा आढावा घेतला, असल्याची माहिती समोर आली आहे. भारतात नक्षल प्रभावित भागात तीव्र घट झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आता देशातील केवळ ४५ जिल्हे नक्षलवादाने प्रभावित आहेत. २०१९ मध्ये ही संख्या ६१ होती.

२०१५ ते २०२० पर्यंत सुमारे ३८० सुरक्षा कर्मचारी, एक हजाराहून अधिक नागरिक आणि ९०० माओवाद्यांनी वेगवेगळ्या भागातील घटनांमध्ये जीव गमावलेला आहे. तसेच, या कालावधीत एकूण ४ हजार २०० माओवाद्यांनीही आत्मसमर्पण केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the meeting with the home minister chief minister uddhav thackeray left delhi directly for mumbai msr
First published on: 26-09-2021 at 14:49 IST