Donald Trump on Joint Attack on Iran: इराणची राजधानी तेहरानवर इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे हल्ला केल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. आज सकाळी इराणच्या विविध शहरांवर क्षेपणास्त्र डागल्यानंतर त्यांनी या हल्ल्यामागे अमेरिका आणि इस्रायल यांचा सहभाग असल्याचे मान्य केले. ट्रुथ सोशल मीडियावर ट्रम्प यांनी एक सविस्तर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी इराणी जनतेलाही आवाहन केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प आपल्या निवेदनात इराणी जनतेला उद्देशून म्हणाले, “तुमच्या स्वातंत्र्याची वेळ जवळ आली आहे. युद्धादरम्यान सुरक्षित स्थळी आश्रय घ्या. तुमच्या घरातून बाहेर पडू नका. बाहेर सध्या धोका असेल. सर्वत्र बॉम्बचा वर्षाव होत असेल. जेव्हा आमचा हल्ला पूर्ण होईल. तेव्हा तुम्ही तुमचे सरकार ताब्यात घ्या. ते तुमचे स्वतःचे सरकार असेल.”

इराणच्या राजवटीला ट्रम्प यांनी भयानक आणि दृष्ट लोकांचा गट म्हटले. इराणचे धोके दूर करून अमेरिकन लोकांचे रक्षण करण्यासाठी हा हल्ला केल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, “काही वेळापूर्वी अमेरिकेच्या सैन्याने इराणमध्ये सशस्त्र कारवाई सुरू केली आहे. इराणी राजवटीपासून असलेल्या धोक्यांना दूर करून अमेरिकन लोकांचे रक्षण करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. इराणच्या क्रूर राजवटीला आम्ही धडा शिकवू. मागच्या ४७ वर्षांपासून इराणने अमेरिकेच्या नाशाचा मंत्र जपला. अमेरिकेचे सैन्य, निरपराध लोकांना लक्ष्य करून रक्तपात घडवला. सामूहिक हत्याकांडाची मोहीम राबवली.”

इराणने त्यांचा अणु कार्यक्रम सुरूच ठेवला आहे आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना विकसित करण्याचा कार्यक्रमही पुढे नेला आहे. यामुळे युरोपमधील आमच्या मित्र राष्ट्रांना आणि सहयोगींना आणि विदेशात तैनात असलेल्या अमेरिकी सैन्यांसाठी यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, यामुळे हा हल्ला आवश्यक होता.