‘विकास वेडा झाला आहे’ च्या यशानंतर आता काँग्रेसने नवी टॅगलाईन तयार केली आहे. सोशल मीडियावर भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस सज्ज असून दिवाळीच्या दिवसांमध्ये काँग्रेसकडून नवी टॅगलाईन सोशल मीडियावर वापरण्यात येईल. ‘विकासची शेवटची दिवाळी’ (#VikasNiChelliDiwali ) हा नवा हॅशटॅग काँग्रेसकडून वापरण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभांना सुरुवात होताच काँग्रेसकडून ‘विकासची शेवटची दिवाळी’ या टॅगलाईनचा वापर करण्यात येईल.

दिवाळीनंतर गुजराती नववर्षाची सुरुवात होईल. ही दिवाळी वेड्या विकासची शेवटची दिवाळी असेल, असे काँग्रेसकडून सांगितले जात आहे. ‘यंदाची दिवाळी ही जुगाड आणि जुमला, यांची अखेरची दिवाळी असेल, हे नव्या टॅगलाईनमधून आम्हाला लोकांना सांगायचे आहे,’ अशी माहिती काँग्रेसचे गुजरात आयटी सेलचे प्रमुख रोशन गुप्ता यांनी सांगितले. मात्र काँग्रेसकडून सोशल मीडियावर चालवले जात असलेले कॅम्पेन कोणावरही वैयक्तिक टीका करण्यासाठी नसल्याचेही त्यांनी सांगितले. ‘आमचे संपूर्ण कॅम्पेन तथ्य आणि आकडेवारीवर आधारित आहे,’ अशीही माहिती त्यांनी दिली. याआधी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी अनेकदा मोदी सरकारवर जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. मोदींचे भाषण म्हणजे खोटी आश्वासने आणि जुमलेबाजी असल्याची टीका विरोधकांनी वारंवार केली आहे.

भाजपला सोशल मीडियाच्या मैदानावर जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याची सुरुवात ‘विकास वेडा झाला आहे,’ या टॅगलाईनने करण्यात आली. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या टॅगलाईनचा वापर करत मोदींच्या होमग्राऊंडवरुन त्यांच्यावर शरसंधान साधले. काँग्रेसच्या या टॅगलाईनचा भाजपनेही चांगलाच धसका घेतला आहे. त्यामुळेच ‘विकास वेडा झाला आहे,’ यावर भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री विजय रुपाणी या दोघांनाही प्रतिक्रिया द्यावी लागली आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने संपूर्ण जोर लावला आहे. यामुळे भाजपसमोर मोठे आव्हान आहे. डिसेंबरमध्ये गुजरातची विधानसभा निवडणूक होणार असून नरेंद्र मोदी केंद्रात गेल्यानंतर राज्यात प्रथमच निवडणूक होत आहे. २०१२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदींनी भाजपला दणदणीत विजय मिळवून दिला होता. यानंतर बडोद्यातून २०१४ मध्ये मोदी लोकसभेवर निवडून गेले.