Donald Trump orders Green Cards Review: अवैध स्थलांतरितांवर चाप लावल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १९ देशांमधील ग्रीन कार्ड धारकांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. जे देश धोकादायक श्रेणीत आहेत, अशा १९ देशांमधून आलेल्या नागरिकांच्या ग्रीन कार्डची पुनर्तपासणी केली जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी वॉशिंग्टन डीसी येथे व्हाईट हाऊसच्या बाहेर दोन नॅशनल गार्ड्सवर गोळीबार करण्यात आला होता. यात एका महिला गार्डचा मृत्यू झाला आहे. यानंतर अमेरिकन प्रशासनाने हे पाऊल उचलले.
२०२१ मध्ये वॉशिंग्टन डीसीमध्ये आलेल्या अफगाण नागरिकाने सदर गोळीबार केला होता. यानंतर यूएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसचे संचालक जोसेफ एडलो यांनी सांगितले की, सदर तपासणी अतिशय कठोर असेल. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या काळात मंजूर केलेल्या आश्रयांच्या प्रकरणांचा आणि १९ देशांमधील नागरिकांना देण्यात आलेल्या ग्रीन कार्डचा व्यापक आढावा घेतला जाणार असल्याचे गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वॉशिंग्टनच्या हल्ल्यानंतर ट्रम्प नाराज
गुरूवारी व्हाईट हाऊसबाहेर नॅशनल गार्ड्सवर गोळीबार करणाऱ्या संशयिताची ओळख पटली. गोळीबार करणारा आरोपी रहमानउल्लाह लकनवाल (वय २९) हा अफगाणी नागरिक आहे. २०२१ मध्ये ‘ऑपरेशन अॅलीज वेलकम’ अंतर्गत तो अमेरिकेत आला होता. हल्लेखोर रहमानउल्लाह लकनवालाच्या व्हिसाची मुदत संपली होती आणि हल्ल्याच्या वेळी तो बेकायदेशीरपणे अमेरिकेत होता.
या घटनेवर बोलत असताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. “ज्याने हा गुन्हा केला त्याला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. हा हल्ला अमेरिकेसमोरील सर्वात मोठा राष्ट्रीय सुरक्षेचा धोका आहे. अफगाणिस्तानातून येणाऱ्या प्रत्येकाची आता पुन्हा तपासणी केली जाईल आणि अमेरिकेसाठी फायदेशीर नसलेल्या किंवा आपल्या देशावर प्रेम न करणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांना हद्दपार करण्यासाठी पावले उचलली जातील”, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते.
यूएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसचे संचालक जोसेफ एडलो यांनीही एक्सवर पोस्ट शेअर करत ग्रीन कार्ड धारकांची माहिती दिली. ते म्हणाले, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निर्देशानुसार ग्रीन कार्ड धारकांची कसून चौकशी केली जाणार आहे. अमेरिका आणि अमेरिकेतील लोकांची सुरक्षा करणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. माझी जबाबदारी आहे की, प्रत्येक विदेशी व्यक्तीची जास्तीत जास्त खोलात जाऊन तपासणी केली जाईल.

ते १९ देश कोणते?
गृह विभागाने चिंता व्यक्त केलेल्या १९ देशांची यादी केली आहे. त्यात अफगाणिस्तान, बर्मा, चाड, रिपब्लिक ऑफ काँगो, गिनी, एरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान, येमेन, बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला या देशांचा समावेश आहे.
