पती, पत्नी और पार्टी…! पत्नीने तृणमूलमध्ये केला प्रवेश, भाजपा खासदाराने दिली घटस्फोटाची धमकी

पश्चिम बंगालच्या राजकारणातील घटना

सुजाता मोंडल खान. (छायाचित्र/एएनआय)

पती, पत्नी और वो… हे तुम्ही ऐकलं असेलच. कदाचित हा चित्रपटही तुम्ही बघितला असेल. पण, सध्या रंगतदार अवस्थेकडे चाललेल्या पश्चिम बंगालमध्ये पती, पत्नी और पार्टी… असा वाद उभा राहिला आहे. या घटनेतील क्लायमॅक्स म्हणजे भाजपा खासदाराच्या पत्नीनं कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. असा हा पेचप्रसंग पश्चिम बंगालमध्ये निर्माण झाला आहे. त्यातूनच संतापलेल्या भाजपा खासदारानं पत्नीला घटस्फोट देण्याची धमकी दिली आहे.

पश्चिम बंगालमध्ये पक्षांतराच्या लाटेला सुरूवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यापासून याची सुरूवात झाली. त्यानंतर आज भाजपाचे खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मोंडल खान यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुजाता मोंडल खान यांनी भाजपातून बाहेर पडत ममतांचा हात धरला आहे.

पत्नी सुजाता मोंडल यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं कळाल्यानंतर नाराज झालेल्या खासदार सौमित्र खान यांनी घटस्फोट देण्याची धमकी दिली. भाजपाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे खान पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले,”मी तिला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. माझी तिला विनंती आहे की, माझं आडनाव लावू नकोस. तुझ्या नावासमोरील खान आडनाव काढून टाक. ते तुझे अधिकार कापून टाकतील. त्यांनी तुझ्यावर हल्ला करण्याची धमकी दिली होती. आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना तुझा जॉब ममता बॅनर्जींनी हिरावून घेतला होता. मी माझं वचन पाळलं. मी तुला उभं केलं. निम्मा पगार तुझ्या खात्यावर जमा केला. कारण तुला पैसे मागायला लागू नये म्हणून आणि आता ज्यांनी तुला भूतकाळात दुःख दिलं, त्यांच्याशी तू हातमिळवला आहेस,” असं बोलताना खान यांचे डोळे भरून आले.

“भाजपानं मला ओळख मिळवून दिली. भाजपाशिवाय मी कुणीच नाही. हे खरं आहे की तू माझा प्रचार केला, पण मी भाजपाच्या नावाशिवाय जिंकू शकलो नाही. प्रत्येक घरात भांडणं होतात. पण महत्त्वकांक्षा जपण्यासाठी तू कुटुंबापेक्षा राजकारण निवडले आङे. तू अडकली आहेस, तुझी खूप मोठी चूक झाली आहे,” असं सांगत खान यांनी घटस्फोट देणार असल्याची माहिती दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: After wife joins tmc bjp mp saumitra khan says will send divorce notice bmh