scorecardresearch

“ही शेवटची संधी….” राजीनामा मागे घेतल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा आक्रमक; सोनिया गांधींना लिहिलं पत्र

सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे.

“ही शेवटची संधी….” राजीनामा मागे घेतल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा आक्रमक; सोनिया गांधींना लिहिलं पत्र
पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घमासान सुरूच आहे.

पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घमासान सुरूच आहे. त्यामुळे काँग्रेसचे संकट अजूनही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे आणि नंतर नाट्यमय पद्धतीने परत येणारे नवज्योत सिंग सिद्धू यांनी आता नवी मागणी केली आहे. सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांना पत्रही लिहिले आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या मागणीसह १३ कलमी अजेंडा सादर केला आहे.

सिद्धू यांनी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. तेव्हा सिद्धू म्हणाले होते की, सर्व प्रश्न सोडवले गेले आहेत त्यामुळे मी समाधानी आहे. सिद्धू यांनी पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या काही निर्णयांवर नाराजी व्यक्त करत पंजाब काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले होते. मात्र, चन्नी आणि इतर नेत्यांच्या समजुतीवर त्यांनी सहमती दर्शवली.

राहुल गांधी व्यतिरिक्त सिद्धू यांनी पक्षाचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांचीही भेट घेतली. त्यांनी पंजाबच्या प्राधान्याशी संबंधित काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यानंतर त्यांचे हे पत्र समोर आले आहे. सिद्धू यांनी पत्रात लिहिले आहे की, “काँग्रेस पक्षाने २०१७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत मिळवले आहे आणि लोकांचे आर्थिक आणि लोकशाही अधिकार बळकट करण्याचे वचन दिले आहे. मी स्वतः ५५ विधानसभा जागांवर प्रचार केला होता, त्यापैकी काँग्रेसने ५३ जागा जिंकल्या. आमदार, पंजाब मंत्रिमंडळात मंत्री आणि आता पंजाब काँग्रेस अध्यक्ष असताना मी पंजाबच्या विकास मॉडेलला प्राधान्य दिले आहे.”

सिद्धू म्हणाले की, १७ वर्षे राजकीय सेवा केल्यानंतर आणि जनभावना समजून घेतल्यानंतर पंजाबच्या पुनरुज्जीवनासाठी ही शेवटची संधी आहे, असे त्यांना वाटत आहे. पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांना दिलेला १८ कलमी अजेंडा आजही महत्त्वाचा आहे. पंजाब हे बऱ्याच काळापासून देशातील सर्वात समृद्ध राज्य आहे. पण गेल्या २५ वर्षांच्या आर्थिक अनियमिततेमुळे पंजाब लाखो कोटींच्या कर्जामध्ये बुडाला आहे.

यापूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री असलेले अमरिंदर सिंग यांच्याशी सिद्धू यांचे मतभेद जगजाहीर होते. नंतर पंजाबमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वीच अमरिंदर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-10-2021 at 13:38 IST

संबंधित बातम्या