AG Perarivalan Rajiv Gandhi Case convict Turns Lawyer: ए. जी. पेरारीवलन हे नाव जवळपास तीन दशकं भारतीय न्यायव्यवस्थेसाठी एका गुन्हेगाराचं होतं. हा साधासुधा गुन्हा नसून भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात थेट फाशीची शिक्षा झालेला गुन्हा होता. पण तीन दशकांमध्ये अशा काही घडामोडी घडल्या, की पेरारीवलन आधी फाशी, मग जन्मठेप, नंतर मुक्तता असा प्रवास करत थेट वकिलीपर्यंत पोहोचले आहेत. ज्या न्यायव्यवस्थेनं त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली होती, ज्या न्यायव्यवस्थेच्या आदेशानं त्यांनी आयुष्याची कित्येक वर्षं तुरुंगात खितपत काढली होती, त्याच न्यायव्यवस्थेत पेरारीवलन आज वकील म्हणून रुजू झाले आहेत!
राजीव गांधींची हत्या आणि त्यानंतरचा खटला
१९९१ साली तामिळनाडूतल्या श्रीपेरूंबुदुरमधील प्रचारसभेदरम्यान झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात राजीव गांधी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या हत्येनंतर काही आठवड्यांतच पेरारीवलन यांच्यासह एकूण ७ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर राजीव गांधींच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला. सविस्तर खटला चालल्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
पुढची अनेक वर्षं पेरारीवलन यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार सातत्याने त्यांची बाजू मांडत होते. या प्रकरणात पेरारीवलन यांना चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आलं असून त्यांना सुनावण्यात आलेली शिक्षा ही रास्त नसल्याचा दावा करत राहिले. खुद्द पेरारीवलन यांच्या आई अर्पुथम अम्मल यांनी अनेक नेतेमंडळी, मुख्यमंत्री, न्यायमूर्ती आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वारंवार भेटीगाठी घेत पेरारीवलन यांना न्याय मिळावा अशी मागणी केली.
अखेर ३१ वर्षांनंतर झाली सुटका!
दरम्यानच्या काळात न्यायालयीन प्रक्रियेत चाललेल्या खटल्यामध्ये पेरारीवलन यांची फाशीची शिक्षा कमी करून जन्मठेपेत बदलण्यात आली होती. त्यानंतर मे २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या कलम १४२ मधील तरतुदींच्या आधारे प्रदीर्घकाळ तुरुंगवास भोगून झालेल्या पेरारीवलन यांची सुटका करण्याचा निर्वाळा दिला. त्यांच्यावरील दहशतवादासंदर्भातील आरोप आधीच मागे घेण्यात आले होते.
तुरुंगातून बाहेर पडताच पेरारीवलन यांनी थेट बंगळुरू गाठलं आणि कर्नाटक राज्य कायदा विद्यापीठांतर्गत डॉ. बी. आर. आंबेडकर लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. २०२५ साली त्यांनी त्यांची कायद्याची पदवी घेतली आणि त्याचवर्षी ऑल इंडिया बार कौन्सिलची परीक्षा देत वकिलीची सनददेखील प्राप्त केली.
५४ वर्षीय पेरारीवलन मद्रास उच्च न्यायालयात रुजू
आता ५४ वर्षांचे पेरारीवलन मद्रास उच्च न्यायालयात वकील म्हणून रुजू झाले आहेत. “मला सुप्रसिद्ध वकील वगैरे व्हायची अजिबात इच्छा नाही. ते माझं ध्येयही नाही. मला कायद्याची कोणतीही मदत नसल्यामुळे तुरुंगात वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या हजारो कैद्यांसाठी लढायचंय. विशेषत: ज्यांना गरिबीमुळे कायदेशीर मदत मिळवणं आर्थिकदृष्ट्या अशक्य झालं आणि फक्त त्यामुळेच आपल्या सुटकेसाठी अनेक वर्षं फक्त प्रतीक्षाच करणाऱ्या जन्मठेपेच्या कैद्यांसाठी मला काम करायचंय”, अशी इच्छा पेरारीवलन यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना व्यक्त केली.
