गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. जम्मू-काश्मीरमधील मंत्रिमंडळातील फेरबदलानंतर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे १९ पेक्षा जास्त आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. एवढंच नाही तर या १९ आमदारांनी एक गुप्त बैठक घेत बंडाचं निशाण फडकावल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे ओमर अब्दुल्लांची खुर्ची धोक्यात आल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहेत. असं असतानाच आता ओमर अब्दुल्लांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
जम्मू-काश्मीरमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे आगा सय्यद रुहुल्ला मेहदी यांनी मंगळवारी बडगाम येथे एका जाहीर सभेत खासदारकीसह पक्षाचा राजीनामा दिला आहे. याच सभेत बोलताना आगा सय्यद रुहुल्ला मेहदी यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यावर जोरदार टीका केली. ‘ओमर अब्दुल्ला यांनी जनतेशी विश्वासघात केला’, अशी टीका मेहदी यांनी केली. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.
मेहदी यांनी राजीनामा का दिला?
आगा सय्यद रुहुल्ला मेहदी यांनी मंगळवारी एका जाहीर सभेत आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा आणि सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे नॅशनल कॉन्फरन्सला मोठा धक्का बसला आहे. मात्र, आगा सय्यद रुहुल्ला मेहदी यांनी राजीनामा का दिला? आणि आता त्यांची पुढील भूमिका काय? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
मेहदी यांनी राजीनामा पत्रात काय म्हटलं?
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात मेहदी यांनी म्हटलं की, “भारतीय राज्यघटनेच्या कलम १०१(३)(ब) अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करून आणि लोकसभेच्या कार्यपद्धती व कामकाज नियमावलीतील नियम २४० नुसार मी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारपदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे. हा राजीनामा मी स्वेच्छेने आणि पूर्ण जाणीवेतून देत आहे. कृपया तो स्वीकारला जावा.”
‘नॅशनल कॉन्फरन्सने जनतेचा विश्वासघात केला’
दरम्यान, आगा सय्यद रुहुल्ला मेहदी यांनी आपल्या निर्णयाची घोषणा करताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि पक्षाध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्यावर जोरदार टीका केली. जम्मू-काश्मीरचे घटनात्मक अधिकार पुन्हा बहाल करण्याबाबतच्या जनतेच्या आकांक्षांशी या नेत्यांनी प्रतारणा केली. नॅशनल कॉन्फरन्सने जनतेचा विश्वासघात केला, अशा शब्दांत मेहदी यांनी संताप व्यक्त केला.
