उत्तर प्रदेशात आलेली थंडीची जोरदार लाट कायम असून या थंडीने आणखी १५ जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे यंदा थंडीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १०७ वर पोहोचली आहे.
मुझफ्फरनगर येथे चार, मथुरा येथे तीन, आग्रा, इटाह आणि बुलंदशहर येथे प्रत्येकी दोन आणि बाराबंकी आणि मिर्झापूर येथे प्रत्येकी एक बळी थंडीने घेतला आहे. उत्तर प्रदेशातील पश्चिमेकडील जिल्ह्य़ांमध्ये कमाल तापमान ४ ते १० अंशांपेक्षाही कमी होते. मोरादाबाद, आग्रा आणि मेरठ विभागांमध्ये रात्रीचे तापमान सामान्यपेक्षाही कमी होते. गोरखपूर, लखनऊ, बरेली येथेही तापमान सामान्यपेक्षाही कमी होते. मुझफ्फरनगर येथे सर्वात कमी म्हणजेच ०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. उत्तर प्रदेशातील पश्चिमेकडील भागांमध्ये काही ठिकाणी दाट धुके पसरले होते. पुढील ४८ तासांतही दाट धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.