राजस्थानमधील उदयपूरमध्ये आजपासून काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिराला सुरुवात होत आहे. या शिबिरात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. या शिबिरात पक्षाचे ४३० हून अधिक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. २०१४ पासून पक्षाचा दारूण पराभव होत असताना काँग्रेसचे हे पहिलेच चिंतन शिबिर अधिवेशन आहे. दरम्यान, काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी नेतृत्व बदलाबाबत सूचना केली होती. त्यामुळे पक्ष तरूण आणि नवे चेहरे नेतृत्वाच्या पातळीवर आणण्याचा विचार पक्ष करेल, असे मानले जात आहे. इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या माहितीनुसार म्हटले आहे की, पक्षाचे नेते काँग्रेसला तरुण पक्ष म्हणून नाव देण्यावर जोर देत आहेत. त्यासाठी संघटनेत पदे भूषविण्याच्या आणि सर्व स्तरावर निवडणुका लढवण्याच्या नेत्यांच्या वयोमर्यादेचा विचार केला जाईल. याशिवाय, पक्ष राज्यसभा सदस्यांसाठी मुदतीची मर्यादा निश्चित करण्याबाबतही गांभीर्याने विचार करण्याची शक्यता आहे.

काँग्रेस चिंतन शिबिराच्या चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, पक्ष दोन प्रस्तावांवर गांभीर्याने विचार करत आहे. तरूणांना नेतृत्व आणि वयोमर्यादा निश्चित करण्याचे प्रस्ताव असणार आहेत. वयोमर्यादा ७० किंवा ७५ असावी? आणि राज्यसभेचा कार्यकाळ काय असू शकतो. यासाठी राज्यसभेसाठी संधी दोन किंवा तीनपर्यंत मर्यादित करावी लागेल? यासोबतच एका ठराविक वयापेक्षा जास्त वयाचा कोणताही नवीन सदस्य कोणत्याही संघटनात्मक संस्थेत समाविष्ट केला जाणार नाही, असाही विचार आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने माहिती दिली की, ७० आणि ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले अनेक नेते पक्षात विविध स्तरांवर पदे भूषवत आहेत. त्यांना पद सोडण्यास सांगितले जाण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा सोनिया गांधी यांचे वय ७५ वर्षे आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे ७९, ओमन चंडी ७८, मनमोहन सिंग आणि ए के अँटोनी यांसारखे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य ८० च्या वर आहेत. त्याचबरोबर अंबिका सोनी, हरीश रावत, पी चिदंबरम, गुलाम नबी आझाद, कमलनाथ यांचेही वय ७० वर्षांपेक्षा जास्त आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे ७१ वर्षांचे आहेत. दुसरीकडे, भाजपने संघटनेत पदे भूषवण्यासाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी आधीच ७५ वर्षे वयोमर्यादा निश्चित केली आहे.