scorecardresearch

कर्नाटकात अंतर्गत आरक्षणाच्या विरोधात आंदोलन, येडियुरप्पा यांचे घर लक्ष्य; दगडफेकीत काही पोलीस जखमी

प्रत्येक समुदायाबाबत केला जाणारा सामाजिक न्याय पचवणे काँग्रेसला जड जात असल्यामुळे त्यांनी हिंसाचाराला फूस लावण्याचा मार्ग चोखाळला आहे.

dv yediurappa house
येडियुरप्पा यांचे घर लक्ष्य; दगडफेकीत काही पोलीस जखमी

पीटीआय, शिवमोगा : कर्नाटकमध्ये राज्य सरकारने अनुसूचित जातींसाठी जाहीर केलेल्या अंतर्गत आरक्षणाच्या विरोधातील आंदोलनादरम्यान बंजारा समुदायाच्या सदस्यांनी सोमवारी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या शिकारीपुरा येथील घराला लक्ष्य केले. त्यांनी केलेल्या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले. यानंतर शहरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

या घटनांमागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला. ‘काँग्रेसचे स्थानिक नेते लोकांना भडकावत आहेत. प्रत्येक समुदायाबाबत केला जाणारा सामाजिक न्याय पचवणे काँग्रेसला जड जात असल्यामुळे त्यांनी हिंसाचाराला फूस लावण्याचा मार्ग चोखाळला आहे. बंजारा समाजाने कुठल्याही ऐकीव माहितीला बळी पडू नये’, असे ते म्हणाले.

 महिलांचा समावेश असलेल्या मोठय़ा संख्येतील निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी छडीमार केला. ‘लमाणी’ नावानेही ओळखले जाणारे बंजारा समाजाचे काही लोक यात जखमी झाले. प्रामुख्याने युवकांचा समावेश असलेले आंदोलक येडियुरप्पा यांच्या घराभोवती गोळा झाले व त्यांनी दगडफेक करून खिडक्यांचे नुकसान केले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून या भागात जादा पोलीस तैनात करण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 00:03 IST

संबंधित बातम्या