नवी दिल्ली :देशभर हिंसक विरोध झालेल्या वादग्रस्त अग्निपथ योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार ठाम असून लष्कराच्या तिन्ही सेवांनी रविवारी अग्निवीरांच्या भरतीचा व्यापक कार्यक्रम जाहीर केला. त्याचबरोबर, ‘अग्निपथ’ विरोधातील जाळपोळ आणि तोडफोडीत सामील झालेल्या तरुणांना या योजनेची दारे बंद असतील, असा इशाराही दिला.

‘अग्निपथ’मध्ये भरती होताना अर्जदार तरुणांना, या योजनेच्या विरोधातील जाळपोळीत सामील नसल्याचे किंवा आंदोलनात भाग घेतला नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले, ‘‘शिस्त हा भारतीय संरक्षण दलाचा पाया आहे. येथे जाळपोळ-तोडफोड आणि निदर्शनांना थारा नाही.’’ अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी अर्ज दाखल करताना संबंधित उमेदवाराला या योजनेविरोधातील कोणत्याही स्वरूपाच्या आंदोलनात सामील न झाल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. तसेच प्रत्येक उमेदवाराची पोलीस पडताळणी करण्यात येईल. एखाद्याविरुद्ध गुन्हा (एफआयआर) दाखल असेल, तर त्याला भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असेही लेफ्टनंट जनरल पुरी यांनी नमूद केले.

तिन्ही सशस्त्र दलांनी रविवारी अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी एक व्यापक कार्यक्रम जाहीर केला. संरक्षण दलातील जवानांचे सरासरी वय कमी करण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी केली जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले. तिन्ही दलांनी भरती प्रक्रियेचा तपशील जाहीर केला.

लेफ्टनंट जनरल यांनी या योजनेचे जोरदार समर्थन केले. ते म्हणाले, ‘‘संरक्षण दलांच्या तीन शाखांमधील जवानांची सरासरी वयोमर्यादा कमी करण्याचा मुद्दा बऱ्याच काळापासून विचाराधीन होता. कारगिल पुनरावलोकन समितीनेही याची गरज अधोरेखित केली होती. या योजनेसंदर्भात प्रदीर्घ चर्चा-विचारविनिमय झाला आहे. आम्ही अन्य देशांच्या संरक्षण दलांचाही अभ्यास केला.’’ तरुणांमध्ये जोखीम घेण्याची क्षमता असते. धाडसाची आवड असते. ‘जोश’ आणि ‘होश’ त्यांच्यात सारखाच असतो. त्यामुळे सरकार ही योजना लागू करत आहे. तरुणांनी योजनेविरोधातील आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहनही पुरी यांनी केले. कोणत्याही परिस्थितीत ही योजना आता मागे घेतली जाणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

या योजनेंतर्गत अग्निवीरांची भरतीच्या नौदलाच्या योजनेची माहिती देताना, व्हाइस अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले, की नौदल मुख्यालय २५ जूनपर्यंत भरतीसाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे प्रसृत करेल. पहिल्या तुकडीचा प्रशिक्षण कार्यक्रम २१ नोव्हेंबपर्यंत सुरू करण्यात येईल. या योजनेंतर्गत नौदलात महिला आणि पुरुष अशा दोघांचीही भरती केली जाणार आहे.

अग्निपथ भरतीबाबत हवाई दलाच्या योजनेबद्दल एअर मार्शल एस. के. झा यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की नोंदणी प्रक्रिया २४ जूनपासून सुरू होईल आणि भरतीच्या पहिल्या टप्प्यासाठी ऑनलाइन परीक्षा २४ जुलैपासून सुरू होईल. हवाई दलात ३० डिसेंबपर्यंत पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू करण्याचा विचार आहे.

भूदलप्रमुख लेफ्टनंट जनरल बन्सी पोनप्पा म्हणाले, की लष्कर २० जूनला (सोमवारी) अधिसूचनेचा मसुदा प्रसृत करेल आणि त्यानंतरच्या अधिसूचना १ जुलैपासून सैन्याच्या विविध भरती केंद्रांद्वारे प्रसृत केल्या जातील. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये देशभरात ठिकठिकाणी भरती मेळावे घेण्यात येणार आहेत. सुमारे ४० हजार जवानांच्या निवडीसाठी देशभरात एकूण ८३ भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. २५,००० जवानांची पहिली तुकडी डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवडय़ात प्रशिक्षण कार्यक्रमात सामील होईल आणि दुसरी तुकडी २३ फेब्रुवारीच्या सुमारास त्यांच्या प्रशिक्षणात सामील होईल.

दरम्यान, बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, हरयाणा आणि तेलंगणासह अनेक राज्यांमध्ये गेल्या चार दिवसांत झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर रविवारी काहीशी शांतता होती. अनेक ठिकाणी तरुणांनी शांततेत आंदोलने केली.

उमेदवारांची पोलीस पडताळणी

शिस्त हा भारतीय संरक्षण दलाचा पाया आहे. येथे जाळपोळ-तोडफोड आणि निदर्शनांना थारा नाही. भरतीसाठी अर्ज दाखल करताना संबंधित उमेदवाराला या योजनेविरोधातील कोणत्याही स्वरूपाच्या आंदोलनात सामील न झाल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. प्रत्येक उमेदवाराची पोलीस पडताळणी करण्यात येईल, असे लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी स्पष्ट केले.

वेळापत्रक असे..

नौदल

२५ जूनपर्यंत भरतीची मार्गदर्शक तत्त्वे, पहिल्या तुकडीचा प्रशिक्षण कार्यक्रम २१ नोव्हेंबपर्यंत, महिला आणि पुरुष अशा दोघांचीही भरती.

हवाई दल

नोंदणी प्रक्रिया  २४ जूनपासून, भरतीच्या पहिल्या टप्प्यासाठी ऑनलाइन परीक्षा २४ जुलैपासून, ३० डिसेंबपर्यंत पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण.

भूदल

२० जूनला अधिसूचनेचा मसुदा सादर, १ जुलैपासून विविध अधिसूचना, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये देशभरात ठिकठिकाणी एकूण ८३ भरती मेळावे, २५ हजार जवानांच्या पहिल्या तुकडीला डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवडय़ात प्रशिक्षण.

काय घडले?

’गुजरात : अहमदाबाद शहरात अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी एकत्र आलेले १४ जण ताब्यात.

’उत्तर प्रदेश : हिंसक आंदोलनप्रकरणी सहारणपूर, भदोही आणि देवरिया जिल्ह्यांत अनेक जण ताब्यात, नऊ जणांना अटक.

’पंजाब : योजनेच्या विरोधात तरुणांचा मोर्चा, चंडीगड-उना राष्ट्रीय महामार्गावर तासभर रास्ता रोको.

’पश्चिम बंगाल : आंदोलनामुळे पूर्व रेल्वेने अनेक रेल्वे गाडय़ा रद्द केल्या, काहींचे मार्ग बदलले.

’तमिळनाडू : दक्षिण रेल्वेने तीव्र आंदोलनामुळे काही गाडय़ा रद्द केल्या.

भाजप नेते विजयवर्गीय यांच्या वक्तव्यावरून वाद

नवी दिल्ली/ इंदूर : भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या ‘अग्निवीरांना भाजपच्या कार्यालयांत सुरक्षारक्षक म्हणून नोकरीत प्राधान्य देण्याच्या’ वक्तव्यावरून नवा वाद उफाळला आहे. तरुणांमध्ये देशरक्षणासाठी लष्करात भरती होण्याचा ध्यास असतो, चौकीदार बनून भाजपच्या कार्यालयांचे संरक्षण करण्यासाठी नाही, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल आणि भाजपचे खासदार वरुण गांधी यांनीही विजयवर्गीय यांच्यावर टीका केली.