केंद्र सरकारने सैन्यदलात भरती होण्यासाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला होणारा विरोध अद्यापही कायम आहे. याच पार्श्वभूमीवर काही संघटनांनी भारत बंदची घोषणा केली आहे असून दिल्लीत याचा फटका बसला आहे. दिल्ली-गुरुग्राम एक्स्प्रेस-वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

भारत बंदची हाक दिली असल्याने दिल्ली पोलिसांकडून सीमेवर वाहनांची तपासणी केली जात आहे. याचा फटका वाहतुकीला बसत आहे. अग्निपथ योजना रद्द करावी अशी आंदोलकांची मागणी आहे.

विश्लेषण: ‘अग्निपथ’ योजनेला तरुणांचा विरोध का? देशभरात हिंसक आंदोलनं का होत आहेत?

दिल्लीत जंतर मंतर येथे विरोधी पक्ष काँग्रेस, आम आदमी पक्ष निदर्शनं करणार आहेत. दुसरीकडे फरिदाबाद आणि नोएडात चारपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असून तसे आदेशच काढण्यात आले आहेत.

बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि तेलंगणा येथे केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात आंदोलनं केली जात आहेत. काही ठिकाणी आंदोलनं हिंसक होत असून यामुळे रविवारी ४८३ ट्रेन्स रद्द करण्यात आल्या.

हिंसक आंदोलकांना ‘अग्निपथ’ची दारे बंद ; भरती प्रक्रियेबाबत तिन्ही दलांची घोषणा

देशभर हिंसक विरोध झालेल्या वादग्रस्त अग्निपथ योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार ठाम असून लष्कराच्या तिन्ही सेवांनी रविवारी अग्निवीरांच्या भरतीचा व्यापक कार्यक्रम जाहीर केला. त्याचबरोबर, ‘अग्निपथ’ विरोधातील जाळपोळ आणि तोडफोडीत सामील झालेल्या तरुणांना या योजनेची दारे बंद असतील, असा इशाराही दिला.

तिन्ही सशस्त्र दलांनी रविवारी अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी एक व्यापक कार्यक्रम जाहीर केला. संरक्षण दलातील जवानांचे सरासरी वय कमी करण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी केली जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले. तिन्ही दलांनी भरती प्रक्रियेचा तपशील जाहीर केला.

वेळापत्रक असे..

नौदल

२५ जूनपर्यंत भरतीची मार्गदर्शक तत्त्वे, पहिल्या तुकडीचा प्रशिक्षण कार्यक्रम २१ नोव्हेंबपर्यंत, महिला आणि पुरुष अशा दोघांचीही भरती.

हवाई दल

नोंदणी प्रक्रिया २४ जूनपासून, भरतीच्या पहिल्या टप्प्यासाठी ऑनलाइन परीक्षा २४ जुलैपासून, ३० डिसेंबपर्यंत पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण.

भूदल

२० जूनला अधिसूचनेचा मसुदा सादर, १ जुलैपासून विविध अधिसूचना, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये देशभरात ठिकठिकाणी एकूण ८३ भरती मेळावे, २५ हजार जवानांच्या पहिल्या तुकडीला डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवडय़ात प्रशिक्षण.