भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी केंद्र सरकारने अलीकडेच अग्नीपथ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेची घोषणा होताच देशभर याचे पडसाद उमटले. बिहारसह उत्तरेतील अनेक राज्यात आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने आंदोलकांनी रेल्वेगाड्या पेटवून दिल्या. एकीकडे देशात अग्निपथ योजनेला विरोध होत असताना दुसरीकडे मात्र अनेक तरुणांनी सैन्यदलात नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नोंदणी सुरू झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत भारतीय हवाई दलाला २ लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे.

भारतीय हवाई दलाने मंगळवारी एक ट्वीट केलं असून आतापर्यंत अग्निपथ योजनेअंतर्गत १ लाख ८३ हजार ६३४ जणांनी नोंदणी केल्याची माहिती दिली. तसेच तुम्हालाही अग्निवीर बनायचं असेल तर https://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी अर्ज भरण्याचं आवाहन हवाई दलाकडून करण्यात आलं आहे.

खरंतर, १४ जून २०२२ रोजी अग्रिपथ योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर बिहारसह अनेक राज्यांमध्ये तत्काळ निदर्शने झाली. तसेच मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून सार्वजनिक मालमत्तेचे मोठं नुकसान झालं. अग्निपथ योजना मागे घ्यावी अशी तीव्र मागणी आंदोलकांनी केली होती. या योजनेनुसार, १७ आणि २१ वयोगटातील तरुणांना चार वर्षांच्या कार्यकाळासाठी सैन्यदलात भरती करून घेतले जाईल. ४ वर्षानंतर त्यातील २५ टक्के जवानांना नियमित सैन्यदलात सामावून घेतले जाईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं.

पाहा व्हिडीओ –

देशभरातून या योजनेला विरोध झाल्यानंतर केंद्र सरकारने नोकरीत भरती होण्याची कमाल वयोमर्यादा २३ पर्यंत वाढवली. यानंतर आता सैन्यदलाकडून भरती प्रक्रिया राबवायला सुरुवात करण्यात आली असून पहिल्या सहा दिवसातच २ लाखाहून अधिक तरुणांनी नोंदणी केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जुलै २०२२ आहे.