Uttarakhand : उत्तराखंडमधील हर्षिल गावात काही महिन्यांपूर्वी ढगफुटी झाल्याची घटना घडली होती. याच ढगफुटीमुळे आलेल्या पुरात अग्निवीर जवान सचिन पोनिया (२३) हा बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अद्याप या अग्निवीर जवानाचा शोध लागलेला नाही किंवा मृतदेहही सापडलेला नाही. त्यामुळे उत्तरकाशी जिल्हा प्रशासनाने आता तब्बल चार महिन्यानंतर या अग्निवीर जवानाचा मृत्यू झाल्याचं गृहीत धरून मृत घोषित केलं आहे.

सचिन पोनिया हा अग्निवीर जवान उत्तर प्रदेशातील हाथरसचा होता. पण बेपत्ता झाल्यानंतर चार महिन्यांहून अधिक काळ झाला. मात्र, अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे उत्तरकाशी जिल्हा प्रशासनाने त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. पण उत्तरकाशी प्रशासनाचा हा निर्णय सचिनच्या कुटुंबाने नाकारला आहे. तसेच तो आता जिवंत नाही हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे सापडले नसल्याचा दावा कुटुंबाने केला आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

उत्तरकाशी जिल्हा प्रशासनाकडून सचिनला मृत घोषित करणारे पत्र मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्हा प्रशासनाने यावर आक्षेप मागवण्यासाठी आदेश जारी केला आहे. हाथरसचे उपविभागीय अधिकारी (SDM) राज बहादूर सिंह यांनी म्हटलं की, “सचिन पोनिया याला मृत घोषित करण्यावर जर कोणाला आक्षेप असेल तर आक्षेप पत्र एसडीएम कार्यालयात कोणत्याही कामकाजाच्या दिवशी ३० दिवसांच्या आत सादर करावं. उत्तरकाशी जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या पत्रानुसार ही नोटीस जारी करण्यात आली आहे.”

हाथरस जिल्ह्यातील करील गावातील सचिन पोनिया हा अग्निपथ योजनेच्या माध्यमातून सैन्यात भरती झाला होता. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात पहिली पोस्टिंग मिळाली होती. तसेच सैन्यात भरती होण्यापूर्वी सचिनने हाथरसमधून पदवी पूर्ण केली होती आणि घटनेपूर्वी साडेनऊ महिने तो उत्तराखंडमध्ये पोस्टिंगवर होता.

सचिनच्या वडिलांनी काय म्हटलं?

“सचिन ऑगस्टपासून बेपत्ता आहे. जवळपास आता पाच महिने होत आले आहेत. पण असं असतानाही थोड्या चौकशीनंतर प्रशासनाने माझा मुलगा आता जिवंत नसल्याचं घोषित केलं आहे. मात्र, तो जिवंत नसल्याचा कोणताही पुरावा नसतानाही मृत कसं घोषित केलं?”, असं सचिनचे वडील चंद्रवीर सिंह यांनी म्हटलं.

“आम्ही सर्वजण सचिन सुरक्षित परतावा यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहोत. पण हाथरस जिल्हा प्रशासनाने आम्हाला कळवलं की उत्तराखंड सरकारने सचिनला आता मृत घोषित केलं आहे. तसेच त्या आदेशावर जर आक्षेप असेल तर आम्हाला आक्षेप घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे, त्यासाठी आम्हाला ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. आम्ही कुटुंबात यावर चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेणार आहोत”, असं सचिनच्या वडिलांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सचिन सुरक्षितपणे घरी परत येईल अशी आशा कुटुंबाला अजूनही आहे. पण त्याच्या मृत्यूच्या अधिकृत घोषणेमुळे सचिनच्या कुटुंबियांची ती आशा डळमळीत झाली असून कुटुंबियांनी दुःख व्यक्त केलं आहे. सचिन बेपत्ता झाल्यापासून कुटुंब उत्तरकाशी जिल्हा प्रशासनाशी नियमित संपर्कात असल्याची माहिती सचिनच्या कुटुंबाने दिली आहे.