उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये लव्ह जिहादचे एक हाय प्रोफाइल प्रकरण समोर आले आहे. आग्रा येथे राहणार्‍या निवृत्त आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीची फसवणूक करणार्‍या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी राजधानी लखनऊ येथील रहिवासी आहे.

या युवकाचे नाव आरिफ असून त्याने आदित्य बनून फसविल्याचा आरोप महिलेने केला आहे. तो नेहमी महिलेला धर्मांतर करण्यासाठी धमकावत असे. पीडित महिलेची लखनौमधील एका कार्यक्रमात आरिफ सोबत भेट झाली होती. यानंतर दोघांमधील ओळखीचे प्रमाण वाढले. पीडित महिलेचे वडील निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. आरोपी लखनौमधील ऐशबाग भागातील लाकूड व्यवसायीक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा- “शर्मिला टागोरांपासून हा लव्ह जिहाद सुरू; पतौडींनीच हे बीज पेरलं”

पीडितेने आरोप केला की, “एका पार्टी दरम्यान या युवकाने माझ्या डोक्यावर कुंकू लावतांना फोटो काढले. तोच फोटो दाखवून, त्याने मला बदनाम करण्याची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याची भीती दाखवून माझे शारीरिक शोषण केले. माझी बदनामी करण्याची भीती दाखवून तो वेळोवेळी माझ्याकडून पैसे घेत असे. यावेळेस त्याचे नाव आदित्य आर्य नसून आरिफ हाश्मी असल्याचे महिलेला कळाले.

आरोपीला अटक

महिलेने आरोपीविरोधात प्राणघातक हल्ला, खून करण्याचा प्रयत्न, बलात्कार, अनैतिक कृत्य, दरोडा, फसवणूक, बेकायदेशीर धर्मांतरण, बदला घेण्यासारख्या गंभीर कलमांखाली आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. तक्रार आल्यानंतर आग्रा पोलिसांनी आरोपीला अटक केली.

आरोपीवर ३२३, ३०७, ३७६, ३७७, ३८६, ३९२, ४२०, ४२७, ५०६ अन्य कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.