Pet Parrot Lost Reward Agra news: ‘राजाचा जीव पोपटात होता’, ही गोष्ट लहानपणी सर्वांनीच ऐकली असेल. गोष्ट चमत्काराशी निगडित असली तरी माणूस आणि प्राणी-पक्षी यांचे प्रेम असंच आहे. पाळीव प्राण्यावर लोक जीवापाड प्रेम करतात. याचा प्रत्यय आग्रा येथे आला. आग्र्यातील कुटुंबाचा प्रिय असलेला पाळीव पोपट हरवल्यानंतर त्याच्या शोधासाठी शहरभरात बॅनर लावले गेले. पोपटाला सुरक्षित परत आणून देणाऱ्यास ५० हजार रुपयांचे बक्षीस या कुटुंबाने जाहीर केले. बॅनरवर फोन नंबरही ठळक अक्षरात छापला होता. पण लोकांनी मात्र बक्षीसाच्या रकमेसाठी कुटुंबाला फोन करून त्रास दिला. पाचच दिवसात दीड हजार फोन आल्याचे या कुटुंबाने सांगितले आहे.
अनेकजण दुसराच पोपट घेऊन आले
आग्र्यातील वकील सुनील सिंह यांनी हे बॅनर लावले होते. १३ जुलै रोजी त्यांचा लाडका ‘माऊ’ हा पोपट जोरदार वादळामुळे उडून गेला. या भावनिक आवाहनानंतर अनेकजण मदतीसाठी पुढे आले, पण कुणाचीही माहिती खरी ठरत नव्हती. काही जणांनी तर दुसराच पोपट वकिलांना आणून दाखवला. पण तो त्यांचा ‘माऊ’ नसल्याचे लक्षात येताच त्यांनी पोपट आणणाऱ्यांचे दावे फेटाळून लावले.
सुनील सिंह पोपटाचे वैशिष्ट सांगताना म्हणाले की, आमच्या माऊच्या पंखावर आणि चोचीच्या खालच्या भागावर विशिष्ट काळे ठिपके आहेत. ज्यांना कुणाला माऊ सापडेल त्यांनी आधी त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढून आम्हाला पाठवावेत. जेणेकरूण त्याची ओळख पटवता येईल.
An Agra family has put up banners and hoardings in the city announcing a reward of ₹50000 for anyone who helps locate their missing parrot "Mao". https://t.co/weu5iWAqz4 pic.twitter.com/ueZipJ0Mi3
— Piyush Rai (@Benarasiyaa) July 18, 2026
अनेक लोक आम्हाला पोपटाचे फोटो आणि व्हिडीओ पाठवत आहेत. तो पोपट आमचा माऊ असल्याचा दावा काही लोक करत आहेत. पक्षी घेऊनही घरी येतायत. पण त्यांच्यापैकी कुणाकडेच आमचा माऊ नाही, अशीही खंत त्यांनी आधी बोलून दाखवली.
माऊ आमच्या कुटुंबाचा सदस्य
माऊ हा केवळ पाळीव पक्षी नाही तर आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे. तो आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य असून आम्हीही त्याला तेवढे प्रेम करतो. तो हरवल्यापासून माझी पत्नी ममता सिंह, मुले आणि घरातील इतर लोक व्यथित झालो आहोत. त्यामुळेच माऊला सुखरूप घरी आणण्यास मदत करणाऱ्यांना आम्ही ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे, असेही सुनील सिंह म्हणाले.

बॅनरवर १ लाखांचा खर्च
बक्षीसाची रक्कम ५० हजार रुपये ठेवली असली तरी सिंह यांनी त्याचा शोध घेण्यासाठी जवळपास १ लाख रुपये खर्च केले आहेत. त्यांनी आग्रा शहरातील प्रमुख चौकात मोठेमोठे बॅनर लावले आहेत. तसेच शहरभर हजारो पत्रके वाटली आहेत. यासाठी त्यांनी तब्बल १ लाख रुपये खर्च केले.
अखेर माऊ सापडला…
आठवड्याभराच्या शोधमोहिमेनंतर सिंह कुटुंबीयांना अखेर माऊ सापडला आहे. एका अज्ञात व्यक्तीने सिंह यांना फोन केला आणि माऊ त्याच्याकडे असल्याचे सांगितले. सिंह यांनी त्याचा व्हिडीओ मागितला. व्हिडीओ पाहिल्यानंतर हा माऊच असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्या अज्ञात व्यक्तीने पहिले पैसे देण्याची आणि ओळख उघड न करण्याची अट ठेवली. पैसे मिळाल्यानंतरच पोपट ताब्यात देईल, असेही तो म्हणाला.
माऊ की घर वापसी. लौटाने वाले शख्स को मिला ईनाम. अधिवक्ता सुनील कुमार एडवोकेट के घर उड़कर आईं खुशियां. आगरा में लगे थे माऊ नामक तोता के लापता होने के होर्डिंग. #Parrot #tota #agra pic.twitter.com/lsksGiT2S3
— Himanshu Tripathi (@thimanshut) July 20, 2026
सिंह यांनी रविवारी संबंधित अज्ञात व्यक्तीला ५० हजार रुपये दिले. ते दिल्यानंतर समोरच्य व्यक्तीने माऊला सिंह यांच्या हवाली केले. सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहितीही दिली आहे. माऊची प्रकृती खालावली असून तो अशक्त झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर आम्ही उपचार करत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. माऊ मिळाल्यामुळे आम्हाला आत्यंतिक आनंद झाला असून कुटुंबाची शोधमोहीम यशस्वी झाल्याचे ते म्हणाले.
