उत्तर प्रदेशच्या आग्रा येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पोलीस हवालदाराने चार वर्ष शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप करत एका महिलेने स्वत:चे जीवन संपवले आहे. ही महिला या पोलीस हवालदाराबरोबर चार वर्षांपासून राहात होती. महिलेने आरोप केला होता की, संबंधित हवलगाराने लग्नाचे आश्वासन देऊन नंतर नकार दिला. तसेच तिने तक्रार केली असता त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

महिलेने आरोप केला की, ताजगंज पोलीस ठाण्यात तैनात असलेला पोलीस हवालदार हा तिच्याबरोबर गेल्या चार वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहत होता. त्याने तिला पत्नीसारखे ठेवले होते आणि लग्नाचे आश्वासन देखील दिले होते मात्र त्याने नंतर तिच्याबरोबर लग्न करण्यास नकार दिला.

या कालावधीत आपले शारीरिक आणि मानसिक शोषण झाल्याचा दावा या महिलेने केला. महिलेनुसार, जेव्हा ती तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली, तेव्हा तिला काहीही केले जाऊ शकत नाही असे सांगण्यात आले आणि हवालदाराविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही.

आपल्या व्हिडीओमध्ये त्या महिलेने सांगितले की, संबंधित हवालदाराने त्याला त्याचे कुटुंब या लग्नासाठी परवानगी देणार नाही असे म्हटले होते. तिने पुढे असाही आरोप केला की, हवालदार आणि त्याच्या कुटुंबाने तिची फसवणूक केली, तिला मानसिक त्रास दिला आणि तिला टोकाची भूमिका घेण्यासाठी भाग पाडले. अनेक वर्षे सोबत राहिल्यानंतर, तो आता दुसर्‍या महिलेशी लग्न करण्याची तयारी करत असल्याचेही तिने नमूद केले.

“एकीकडे त्याचा मोठा भाऊ मला लग्न करायला सांगत आहे, तर दुसरीकडे हवलदार मला त्याचे कुटुंब त्याला माझ्याशी लग्न करू देणार नाही असे म्हणत आहे. मी म्हणते की लग्न करू नका, पण किमान कोणत्याही मुलीची फसवणूक तरी करू नका,” असे ती महिला व्हिडीओमध्ये म्हणताना दिसते.

महिला पुढे बोलताना म्हणाली की, “माझ्या मृत्यूला हवालदार आणि त्याचे संपूर्ण कुटुंब जबाबदार आहे. त्यांनी माझी इतकी फसवणूक केली आणि मला इतका मानसिक त्रास दिला की त्यांनी मला जीव देण्यास भाग पाडले.”

इतके वर्ष एकत्र राहिल्यानंतर आता हा हवलदार दुसऱ्या महिलेशी लग्न करण्याच्या तयारीत आहे असेही या महिलेने सांगीतले,

महिलेने या व्हिडीओमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील आवाहन केले आहे. जिवंत असताना तर आपल्याला न्याय मिळाला नाही, मृत्यूनंतर तरी न्याय मिळेल अशी आपल्याला आशा असल्याचे ती म्हणाली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही महिला मूळची उत्तर प्रदेशच्या कासगंज जिल्ह्यातील आहे. या महिलेचा पूर्वी घटस्फोट झालेला होता आणि ती आग्रा येथे एक खाजगी नोकरी करत असताना तिची या हवालदाराशी ओळख झाली.

या महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेस पडला त्यानंतर हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान या महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर हवलदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याच आला आहे. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.