आग्र्याच्या बाह परिसरात रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यामुळे रुग्णवाहिका दोन तासांहून अधिक काळ अडकल्याने गर्भवती महिलेला वेळेवर रुग्णालयात पोहोचवणे शक्य झाले नाही. आणि त्यामुळे उपचाराला झालेल्या विलंबामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. गढबर या गावात ३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री हा प्रकार घडला. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

रुग्णवाहिका अडकली खड्ड्यात

२५ वर्षीय निधी हिला ३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजता प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. त्यानंतर कुटुंबीयांनी आपत्कालीन क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका मागवली. रुग्णवाहिका काही वेळातच गावात पोहोचली आणि निधीला घेऊन, आरोग्य केंद्राकडे निघाली. त्यांना बह गावातील घरापासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावरील सामुदायिक आरोग्य केंद्रात पोहोचायचे होते.

निधीला घेऊन निघालेली रुग्णवाहिका गावाला मुख्य महामार्गाशी जोडणाऱ्या रस्त्यावरून जात असताना घरापासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर ती मोठ्या खड्ड्यात अडकली. रस्त्यातल्या ज्या खड्ड्यात ती रुग्णवाहिका अडकली तो खड्डा सुमारे १० फूट लांब, तीन फूट रुंद व दोन फूट खोल होता. रस्त्यावर चिखल साचलेला होता. रुग्णवाहिका बाहेर काढण्यासाठी चालकाने खूप प्रयत्न केले; पण तेथे आजूबाजूला साचून राहिलेल्या चिखलामुळे चालकाला खड्ड्यातून वाहन बाहेर काढून, पुढे नेणे शक्य झाले नाही. रुग्णवाहिका खड्ड्यात अडकल्यानंतर चालकाने रुग्णवाहिकेसाठी केल्या जाणाऱ्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून वाहन अडकल्याची माहिती दिली होती. अखेर गावकऱ्यांनी ट्रॅक्टरची व्यवस्था केली. ट्रॅक्टरच्या मदतीने रुग्णवाहिका बाहेर काढण्यासाठी जवळपास दोन तास लागले. या विलंबामुळे प्रसूतीच्या अवस्थेत असलेल्या निधीला वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत.

रुग्णालयात पोहोचेपर्यंत बराच विलंब

रुग्णवाहिका बाहेर काढल्यानंतर निधीला पर्यायी मार्गाने आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावी लागेल आणि ती दुसऱ्या दिवशी केली जाईल, असे सांगितल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. यानंतर कुटुंबीयांनी निधीला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. पहाटे सुमारे ५ वाजता तिची प्रसूती झाली. मात्र, बाळ मृतावस्थेत जन्मल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. निधीच्या नातेवाईकांनी दावा केला की, खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी वैद्यकीय उपचार मिळण्यास झालेल्या विलंबामुळे बाळाचा श्वास थांबला असल्याचे सांगितले. मात्र, या दाव्याची स्वतंत्र वैद्यकीय पुष्टी अद्याप समोर आलेली नाही.

रस्त्याची महिनाभरापासून दुरवस्था

ही घटना रविवारी समोर आली. रुग्णवाहिका खड्ड्यात अडकल्यानंतर तिला ट्रॅक्टरच्या मदतीने बाहेर काढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. निधीचा चुलत भाऊ भानू प्रताप सिंह यांनी या खड्ड्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, बह तहसीलमधील गढवार गावाला जोडणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याचा काही भाग सुमारे महिनाभरापूर्वी पावसामुळे वाहून गेला होता. गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली होती. मात्र रस्त्याची दुरुस्ती केली गेली नाही, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे स्पष्टीकरणाची मागणी

आग्रा येथील उपविभागीय दंडाधिकारी विनोद कुमार यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. खड्डा नेमका कधी निर्माण झाला आणि त्याची दुरुस्ती अद्याप का करण्यात आली नाही, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्पष्टीकरण मागवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.